कॅम्प येथील क्लिनिकमधील चोरीनंतरच्या प्रकारानंतर संशय व्यक्त
बेळगाव : कॅम्प येथील बंद क्लिनिकचा कडीकोयंडा फोडून सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज पळविण्यात आला होता. चोरीनंतर कडीला पुन्हा खिळे मारून गेल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासंबंधी डॉ. सबास्टियन डिसोझा यांनी सोमवारी पोलीस आयुक्तांना निवेदनही दिले आहे. गुरुवार दि. 29 मे रोजी यासंबंधी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी डॉ. सबास्टियन यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन सविस्तर माहिती दिली आहे. यापूर्वीही आपल्या क्लिनिकमध्ये अशा घटना घडल्या आहेत. आपल्यावर हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यापैकी कोणत्याही प्रकरणात कारवाई झाली नाही. याकडे त्यांनी पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कडीकोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोकड पळविल्यानंतर कडीला पुन्हा मोळे मारण्यात आले आहेत. या इमारतीसंबंधीचा वाद व काही जणांवर त्यांनी संशय व्यक्त केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.









