दुचाकी, दोन मोबाईलसह दोघांना अटक
बेळगाव : नशामुक्त बेळगावसाठी पोलिसांचे अभियान सुरूच आहे. गांजा, हेरॉईन, पन्नी विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. हालभावीजवळ 5 किलो 652 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शहर सीईएन पोलीस स्थानकात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 1 लाख 91 हजार 200 रुपये किमतीचा गांजा, एक दुचाकी, दोन मोबाईल जप्त केले आहेत.
ताजिब अब्दुलरझाक मुल्ला (वय 25) राहणार मल्लापूर पीजी, ता. गोकाक, सध्या राहणार चिकोडी, अनुराग उदयकुमार यरनाळकर (वय 35) राहणार संकेश्वर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कंट्रोल रूम विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद यांनी सीईएनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे. शहर सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांचे सहकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. हालभावीजवळील चिगरीमाळ क्रॉसनजीक गांजा विक्री सुरू असल्याची माहिती समजताच अचानक छापा टाकून ताजिब व अनुराग यांना ताब्यात घेण्यात आले. गांजा विक्रीसाठी त्यांनी आणलेली दुचाकी, दोन मोबाईल संच व 5 किलो 652 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला.









