ट्रॉलर्सवरील कामगार परतू लागले : नारळीपौर्णिमेपासून खऱया अर्थाने येणार वेग
प्रतिनिधी /पणजी
येत्या सोमवार दि. 1 ऑगस्टपासून राज्यात अधिकृत मासेमारीस प्रारंभ होत असला तरी विद्यमान स्थिती पाहता खरी मासेमारी नारळीपौर्णिमेपासूनच सुरू होईल अशी चिन्हे आहेत.
अनेक ट्रॉलर्स मासेमारीसाठी तयार करण्यात आले असले तरी त्यांचे गावी गेलेले कामगारच परतले नसल्यामुळे समुद्रात जाता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. गोव्यात ट्रॉलवर काम करणारे 98 टक्के कामगार हे केरळ, ओरीसा, बिहार, तामिळनाडू, झारखंड, आदी राज्यातील आहेत. अशावेळी मासेमारी बंदीकाळ दोन महिन्यांचाच असला तरी एकदा गावी गेलेले बहुतेक कामगार हे तेथील शेतीची कामे पूर्ण करुनच गोव्यात परतत असतात. त्यामुळे त्यांना येण्यास किमान अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. परिणामी गोव्यात पूर्ण क्षमतेने मासेमारी सुरु होण्यास नारळी पौर्णिमेनंतरच खऱया अर्थाने वेग येतो.
राज्यात मालिम, कुटबण, शापोरा, आदी जेटीवर मिळून 1200 पेक्षा जास्त ट्रॉलर्स आहेत. त्यातील एकटय़ा मालिम जेटीवरच सुमारे 300 ट्रॉलर्स आहेत. सध्या गत दोन महिन्यांपासून ते बंद असून गावी न जाणाऱया कामगारांकडून त्यांची किरकोळ दुरुस्तीकामे, रंगरंगोटी, जाळी विणणे/दुरुस्ती आदी कामे पूर्ण करून मासेमारी हंगामासाठी सज्ज करण्यात येतात.
सध्या हा बंदीकाळ संपत आला असून 1 ऑगस्टपासून मासेमारी प्रारंभ होणार आहे. मात्र अद्याप निम्मेसुद्धा कामगार गोव्यात परतलेले नाहीत. प्राप्त माहितीनुसार अनेक राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे शेतीकामे रखडलेली आहेत. ती पूर्ण केल्याशिवाय या कामगारांना गाव सोडता येत नाही. त्याचा परिणाम गोव्यातील मासेमारीवर होणार अशी चिन्हे दिसत आहेत. सध्यस्थितीत बरेच कामगार गोव्यात परतू लागले असले तरी त्यांची संख्या अपेक्षेएवढी नाही. त्यामुळे 1 ऑगस्टपासून मोजकेच ट्रॉलर्स मासेमारीसाठी निघतील अशी शक्यता आहे.









