दापोली :
मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोलीमध्ये पर्यटन व मासेमारीचा २०२४-२५चा हंगाम तोट्यात गेल्याचे चित्र व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. मे महिना किमान चांगला जाईल अशी अपेक्षा असताना मान्सूनपूर्व पावसाने या अपेक्षांवरही पाणी फेरल्याने येथील व्यावसायिकांवर हातावर हात ठेऊन बसण्याची वेळ आली आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह मच्छीमारांची आर्थिक गणिते बिघडली आहेत.
मासेमारी, पर्यटनाच्या मुख्य हंगामाच्या कालावधीत अर्थात मे महिन्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा पर्यटन व्यवसाय व मच्छीमारांसाठी मोठ्या नुकसानीस कारणीभूत ठरला. मे महिना अर्धा संपत नाही तोवर पावसाने जोरदार सुरूवात केली. यामुळे अनेक पर्यटकांनी हॉटेल रुम बुकिंग देखील रद्द केले. तालुक्यात पर्यटन व मच्छीमारी व्यवसायाची कोटीची उलाढाल धोक्यात आल्याचे हॉटेल व्यावसायिक व मच्छीमारांनी सांगितले.
- हॉटेल्स संख्या वाढते पण
दिवाळीपासून पर्यटन हंगाम सुरू होतो. तो जूनच्या १० तारखेपर्यंत चालतो. मात्र यावर्षी पर्यटक दापोलीत फारच कमी आले. मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा असल्याने पर्यटक येत नाहीत. यामुळे हे महिने अनेक हॉटेल व्यावसायिकांना तोट्यात टाकतात. परंतु मे महिना जोरदार हंगामाचा आहे. परंतु यावर्षी मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातल्याने पर्यटकांनी पाठ फिरवली. पर्यटन व्यवसायावर अनेकांची कुटुंबे चालतात. दरवर्षी हॉटेल, रिसॉर्ट रुमची संख्या वाढत आहे. परंतु या संख्येप्रमाणे पर्यटकांची संख्या देखील कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
- संकटे संपता संपेनात
२०२४-२५ या कालावधीमध्ये मासेमारीला प्रारंभ झाल्यानंतर अनेक समस्या अनेक संकट मच्छीमारांवर आल्या. समुद्राला उधाण, पाऊस, वेगवान वारे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यात एलईडी नौका यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमार मेटाकुटीला आला. त्यामुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित यावर्षी बिघडलेले आहे.
यावर्षी मे महिन्याचा शेवटचा कालावधी मासेमारीला असताना वेगवान वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प झाली. यामुळे डिझेलचा खर्च, बोटींवर काम करणाऱ्या लोकांचा खर्च अशा अनेक समस्येत मच्छीमार बांधव अडकला आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज पाहता व मासेमारीचा कलावधी संपत आल्याने बहुतांश नौकाधारकांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर आणून शाकारुन ठेवल्या. मासेमारीच्या माध्यमातून दरवर्षी कोटींच्या घरात उलाढाल होते.
मासेमारी व हॉटेल व्यवसायावर तालुक्यातील अनेक घरे कुटुंब चालतात. त्यामुळे हॉटेल व मच्छीमार व्यावसायिकांच्या यावर्षी झालेल्या नुकसानीबाबत व्यावसायिकांकडून निवेदने देखील प्रशासकीय यंत्रणा देण्यात आली असून शासकी यंत्रणेकडून याबाबत सकारात्मक पावले उचलणे गरजेचे बनले आहे.
- शासनाने लक्ष देणे गरजेचे
यावर्षी पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासूनच पर्यटक कमी प्रमाणात आले. त्यात मे महिना हा शेवटचा हंगाम असताना मे महिन्यात युद्ध सदृश स्थिती व अखेरीस आलेला पाऊस यामुळे मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे शासनाने हॉटेल व्यवसायिकांच्या नुकसानीकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.
– मंगेश मोरे, हॉटेल व्यावसायिक, कर्दे
- पर्यटन व्यावसायिकांच्या पदरी निराशाच
पर्यटन हंगामापासून पर्यटक कमीच आले. त्यात मे महिन्यात झालेल्या पावसाने पर्यटकांनी पाठ फिरवल्याने मोठे नुकसान झाले. त्यानंतर एकंदरीत जूनच्या १० तारखेपर्यंत पर्यत येत असतात. जूनमध्ये पाऊस नाही. तरी देखील पर्यटक नाहीत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची निराशा झाली आहे.
– नरेश पेडणेकर, लाडघर हॉटेल व्यावसायिक
- आता तरी शासनाने लक्ष द्यावे
आधीच अनेक समस्यांमुळे मासेमारी अडथळे येत आहेत. त्यात मे महिना तरी चांगला जाईल असे वाटत होते. परंतु समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मच्छीमारांचे आर्थिक गणित चांगलेच बिघडवले. त्यामुळे अनेक समस्या उभ्या आहेत. त्यामुळे आता तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे.
– महेंद्र चौगुले, हर्णे मच्छीमार








