रत्नागिरी :
कोकण किनारपट्टीवर नव्या मासेमारी हंगामाला अवघ्या दोन दिवसांत सुरुवात होणार असली तरी, सलग सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांनी आणि मुसळधार पावसाने मच्छिमारांची चिंता वाढवली आहे. येत्या १ ऑगस्टचा मासेमारीचा पारंपरिक मुहूर्त टळण्याची शक्यता आता अधिक गडद झाली आहे, अनेक बोटी अजूनही किनारीच थांबून आहेत.
गेले दोन महिने मासेमारी बंदीमुळे बोटी किनाऱ्यावरच शाकारून ठेवलेल्या होत्या. ३१ जुलैला ही बंदी संपत असल्याने मच्छिमारांनी नव्या हंगामाच्या स्वागतासाठी लगबग सुरू केली होती. बोटींची डागडुजी, रंगरंगोटी, जाळ्यांची दुरुस्ती अशी कामे वेगाने सुरू होती. डिझेल, अन्नधान्याची जमवाजमव देखील अंतिम टप्यात होती. किनाऱ्यावर जाळी विणण्यापासून ते होड्यांना तेल लावण्यापर्यंतची कामेही जोमात होती.
मात्र, जिल्ह्यावर अजूनही पावसाचा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा जोर कायम आहे. त्यामुळे बोटी समुद्रात उतरवाव्यात की नाही, याबद्दल मच्छिमारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास १ ऑगस्टला समुद्रात जाणाऱ्या नौकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच असेल, अशी शक्यता मच्छीमार वर्तवत आहेत. दरवर्षी मोठ्या श्रद्धेने, समुद्रात भरपूर मच्छी मिळो आणि नुकसान टळो अशी प्रार्थना करून, शुभ मुहूर्त साधून मच्छीमारी होड्या समुद्रात सोडल्या जातात. काही मच्छीमार नारळी पौर्णिमेनंतरच बोटी पाण्यात उतरवण्यास प्राधान्य देतात. यावर्षी मात्र हवामानामुळे पारंपरिक मुहूर्त सोडावा लागण्याची चिन्हे आहेत.
- हवामान बदलाचा परिणाम
▶ जिल्ह्यातील मच्छीमारांना लहरी निसर्गाचा फटका
▶ १ ऑगस्टच्या प्रारंभाला खराब हवामानामुळे खोळंबा








