प्रतिनिधी/ पणजी
राज्यात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक विधींसह साजरी करण्यात आली. मत्स्यव्यवसाय खात्यातर्फे समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारी हंगामाचाही शुभारंभ करण्यात आला. नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्रपूजनाचा प्रमुख सोहळा पणजीत मत्स्यव्यवसाय खात्यातर्फे कॅप्टन ऑफ पोर्ट्स जेटीवर आयोजित करण्यात आला. मत्स्यव्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी प्रथम जलदेवतेचे विधीवत पूजन केले व नंतर पारंपरिक पद्धतीने समुद्राला नारळ अर्पण केला.
त्यावेळी खात्याचे सचिव प्रसन्न आचार्य, संचालक डॉ. शमिला मोन्तेरो यांच्यासह अन्य अधिकारी, मच्छीमारी व्यवसायातील प्रमुख व्यावसायिक, स्थानिक नागरिक उपस्थित होते. काही पर्यटकांनीही या सोहळ्यात उत्साहाने भाग घेतला. कार्यक्रमादरम्यान मच्छीमारांच्या कल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांनी माहिती देण्यात आली. नारळी पौर्णिमेपासून मच्छीमार हंगामाची सुरुवात होत असल्याने या सणाला विशेष महत्त्व असते.









