रत्नागिरी :
येथील मिरकरवाडा बंदरात मासेमारी करून परतणाऱ्या ‘अमीना आयशा’ नावाच्या नौकेला समुद्रात अजस्त्र लाटेमुळे जलसमाधी मिळाली. बंदरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भगवती बंदर ब्रेकवॉटर वॉलच्या टोकाजवळच लाटेच्या प्रचंड तडाख्याने ही नौका उलटली आणि त्यावरील मालक, तांडेल आणि सहा खलाशी असे एकूण आठ जण पाण्यात फेकले गेले. यापैकी सहा जणांना इतर मच्छीमार नौकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले. पण दोन खलाशी बेपत्ता झाले होते. त्यातील एका खलाशाचा मृतदेह सोमवारी दुपारी मिळून आला. तर दुर्घटनाग्रस्त नौकेला जलसमाधी मिळाली. मासेमारी हंगामाच्या सुरूवातीलाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे मच्छीमारांमध्ये शोककळा पसरली आहे.
दुर्घटनाग्रस्त अमीना आयशा (पाट्याची बोट, नं. आयएनडी एमएच 04 एमएम – 6043) ही शब्बीर अलिसाहब मजगांवकर रा. रत्नागिरी यांच्या मालकीची आहे. तर दुर्घटनेत विनोद हिरू धुरी (48, मूळ रा. गोवा सध्या, रा. मांडवी, रत्नागिरी) आणि इनामुद्दीन हसन (24, रा. आसाम, सध्या रा, रत्नागिरी) हे दोघे बेपत्ता झाले होते. त्यापैकी विनोद धुरी या खलाशाचा मृतदेह सोमवारी आढळून आला. हे दोघे त्या नौकेवर पागी म्हणून कार्यरत होते.

दुर्घटनाग्रस्त ‘अमीना आयशा‘ नौका रविवारी पावस-वायंगणी दिशेने सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेली होती. त्यावेळी त्या नौकेवर शब्बीर मजगांवकर, अब्दुल रशिद अलिसाहेब मजगांवकर (35 रा. मिरकरवाडा), फैज अब्दुलमजिद बुडीये (39, रा. कर्ला रत्नागिरी), इम्तीयाज मिरकर (37, रा. राजिवडा रत्नागिरी), विनोद धुरी (48 रा. मांडवी), रबिजोल इस्लाम चौधरी (21, रा. आसाम), जियाउद्दीन लष्कर (20, रा. आसाम) आणि इनामुद्दीन हसन (24, रा. आसाम) असे आठजण होते. मासे पकडून झाल्यावर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा मिकरवाडा बंदरात परतत होते. भगवती किल्ला जवळील ब्रेकवॉटर टोकावर आल्यावर एक मोठी लाट उसळली. या लाटेमुळे नौका उलटली.
- आठही जणांनी घेतल्या समुद्रात उड्या
बोट उलटल्यानंतर बोटीवरील आठही जणांनी जीव वाचविण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. आपला जीव वाचवण्यासाठी पोहण्यास सुरुवात केली. बोट पाण्याखाली जात असताना खलाशांनी काही अंतरावर असलेल्या नौकेला पाहून जोरदार आरडाओरडा केला. त्यावेळी समुद्रात असलेल्या एका बोटीने लागोलाग बुडणाऱ्या नौकेकडे खलाशांची आरडाओरड ऐकून धाव घेतली. त्यावेळी शब्बीर मजगांवकर, अब्दुल मजगावकर, फैज बुडीये, इम्तीयाज मिरकर, रबिजोल, जियाउद्दीन या सर्वांना आपल्या बोटीवर घेत वाचविले. त्यांना तातडीने ऊग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
- अन्य मच्छीमारांचे बचावकार्य
रात्रीच्या अंधारात आणि खवळलेल्या समुद्रामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, आजूबाजूच्या इतर मच्छीमारांनी आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र बेपत्ता झालेल्या दोघांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. सोमवारी सकाळपासून त्यांचा समुद्रात तसेच किनारी भागात शोध सुरू होता. याबाबत मत्स्य व्यवसाय खात्याला खबर देण्यात आली. तसेच याप्रकरणी नौका मालक शब्बीर मजगांवकर यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी तसेच अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी भगवती बंदर ब्रेकवॉटर वॉल येथील किनाऱ्यावर भेट देत पाहणी केली. पोलीस बेपत्ता पागींचा शोध घेत असताना सोमवारी दुपारी पांढरा सुमद्र येथे विनोद धुरी याचा मृतदेह सापडला. मात्र पागी एनामुद्दीन हसन अद्यापही बेपत्ता आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मच्छीमारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर मच्छीमार समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
- मृतदेह आणण्यासाठी घेतली नौकेची मदत
सोमवारी सकाळपासून इतर नौकांच्या सहाय्याने बेपत्तांचा शोध सुरू होता. सकाळी एक मृतदेह मिऱ्या समुद्रात तरंगत असल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी आfिण पोलीस मिऱ्या समुद्रकिनारी दाखल झाले. नजरेसमोर समुद्रात तरंगणारा मृतदेह लाटांच्या माऱ्यांमुळे पुढे येताना दिसला. पण काही वेळाने ओहेटीमुळे तो मृतदेह पुन्हा समुद्रात ओढला गेला. त्या मृतदेहाची खात्री करण्यासाठी मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांनी ड्रोनची मदत घेण्याचे ठरवले. पण मिऱ्या परिसर हा ‘नो फ्लाय झोन’ असल्याने याठिकाणी ड्रोन उडवण्यात अडचण आली. त्यामुळे पोलीस आणि मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या एका मासेमारी नौकेची मदत घेतली. त्या नौकेने तरंगणारा मृतदेह किनाऱ्यावर आणला. तो मृतदेह विनोद धुरी याचा असल्याचे स्पष्ट झाले.








