विविध जलाशय, तलावातून मत्स्य उत्पादन : उत्पादनात वाढ होण्याची शक्यता
बेळगाव : मत्स्य खात्याकडून विविध जलाशय आणि तलावांमधील मासेमारीला प्रारंभ झाला आहे. यंदा पावसाळ्यात लाखो मत्स्य बीज सोडण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात माशांच्या उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षाही खात्याने ठेवली आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे जलाशय आणि तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे साहजिकच मत्स्य उत्पादनात वाढ होणार आहे. पावसाळी हंगामामध्ये खात्याने विविध जलाशये आणि तलावांमध्ये 9 लाख 83 हजार मत्स्यबीज (माशांची पिल्ले) सोडली होती. सोडलेल्या मत्स्यबिजाची पूर्णपणे वाढ झाली आहे. त्यामुळे खात्यामार्फत मासेमारीला सुरुवात झाली आहे. विशेषत: जून ते ऑगस्ट दरम्यान कटला, गिरमल, राहो, मृगळ जातीचे मत्स्यबीज सोडण्यात आले होते.
मत्स्य उत्पादनाला प्राधान्य
हिडकल, राकसकोप, नवलतीर्थ (सौंदत्ती) येथील जलाशयांबरोबर इतर तलावांमध्ये माशांची पिल्ले सोडण्यात आली होती. तीन-चार महिन्यानंतर वाढ झालेल्या माशांसाठी तलावांमध्ये जाळी टाकली जात आहेत. मत्स्य खात्याने जिल्ह्यातील काही तलाव भाडेतत्त्वावर घेतले आहेत. या तलावातून मासेमारी केली जात आहे. मत्स्य खात्याकडून अधिक उत्पादनासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविली जात आहे. या अंतर्गत मत्स्य उत्पादनावर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांत जलाशयांबरोबर तलावांची निर्मिती करून मत्स्य उत्पादनाला प्राधान्य दिले जात आहे.









