वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
झिंबाब्वे विरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी क्रिकेट न्यूझीलंडने संघ घोषित केला असून वेगवान गोलंदाज मॅथ्यु फिशर या नवोदिताला संधी दिली आहे. या मालिकेसाठी टॉम लॅथमकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
मॅथ्यु फिशरने 19 वर्षांखालील वयोगटातून खेळताना 14 प्रथमश्रेणी सामन्यातून 51 गडी बाद करून निवड समितीचे लक्ष्य वेधून घेतले आहे. 25 वर्षीय फिशेर आता आपले कसोटी पदार्पण झिंबाब्वेविरुद्ध करेल. या मालिकेतील पहिली कसोटी बुलावायो येथे 30 जुलै ते 3 ऑगस्ट तर दुसरी आणि शेवटची कसोटी बुलावायोमध्ये 7 ते 11 ऑगस्ट दरम्यान खेळविली जाईल. न्यूझीलंड कसोटी संघामध्ये निकोल्सचे 2023 नंतर पुनरागमन होत आहे.
न्यूझीलंड संघ – टॉम लॅथम (कर्णधार), ब्लंडेल, कॉन्वे, डफी, फिशर, मॅट हेन्री, मिचेल, निकोल्स, ओरूरके, अजाज पटेल, फिलिप्स, रचिन रविंद्र, सॅन्टेनर, नाथन स्मिथ व यंग.









