मत्स्य उत्पादकांना फटका
बेळगाव : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या किल्ला तलावामध्ये मागील काही दिवसांपासून मासे मरून पडत असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. 16 हेक्टर क्षेत्र असलेल्या तलावात मत्स्यपालन केले जाते. पावसाळ्यादरम्यान जुलै महिन्यात 80 हजार ते 1 लाख मत्स्यबीज (माशांची पिले) सोडण्यात आली होती. मात्र, आता पूर्ण वाढ झालेले हे मासे मरून पडू लागले आहेत. त्यामुळे मत्स्य शेती करणाऱ्यांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. फंगस आणि इतर कारणांमुळे मासे मरत असल्याची माहितीही मत्स्य खात्याने दिली आहे. मत्स्य खात्याकडून मत्स्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. शिवाय जिल्ह्यातील विविध जलाशये आणि तलाव भाडेतत्त्वावर घेतले जात आहेत. या जलाशय आणि तलावांमध्ये पावसाळ्यात माशांची पिले सोडली जातात. त्यानंतर त्यांची पूर्ण वाढ झाल्याबरोबर ते बाहेर काढले जातात. मात्र, आता किल्ला तलावातील मोठे झालेले मासे मरून पडत असल्याने भाडेतत्त्वावर तलाव घेतलेल्या मच्छीमारांना फटका बसू लागला आहे. सांडपाणी आणि इतर रासायनिक पाणी तलावात मिसळत असल्याने मासे मरून पडत असल्याची तक्रार मच्छीमार संघटनेने केली आहे. तर ऑक्सिजन आणि वाढत्या उन्हामुळे मासे मरत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. दूषित पाण्यामुळे माशांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याच्या नमुन्याची चाचणी करून सांडपाण्याला पर्यायी मार्ग काढून द्यावा, अशी मागणीही केली आहे.
फंगसमुळेच घडला प्रकार
किल्ला तलावामध्ये मृत्युमुखी पडलेले मासे हे फंगसमुळे मृत्युमुखी पडले आहेत. काही तलाव भाडेतत्त्वावर मत्स्य उत्पादनासाठी देण्यात आले आहेत. डॅम व तलावातील पाण्याची चाचणी करण्यात आली आहे. फंगसमुळेच हा प्रकार घडला आहे.
-रघुनाथ शिंदे, तालुका मत्स्याधिकारी









