खाताच महिलेचा झाला मृत्यू
मलेशियात पफर माशाचे सेवन केल्याने 83 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिच्या पतीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या माशाची डिश तज्ञांच्या देखरेखीतच तयार केली जाते. या माशामधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी हे तज्ञ प्रशिक्षित असतात.
मृत महिलेच्या पतीने स्थानिक दुकानातून पफर मासा खरेदी केला होता. हा मासा खाल्ल्यावर महिलेला त्वरित उलटय़ा होऊ लागल्या. तर काही काळानंतर तिच्या पतीची प्रकृती बिघडली, अशा स्थितीत त्यांना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले, जेथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले आहे.

या घटनेनंतर मलेशियाच्या फूड अँड ड्रग विभागाने पफर माशामध्ये घातक टॉक्सिन टेट्रोडोटॉक्सिन आणि सॅक्सिटॉक्सिन आढळून येत असल्याचे सांगितले. या घातक टॉक्सिनला शिजवून किंवा गोठवून नष्ट करता येत नाही. परंतु जपानमध्ये या माशाद्वारे तयार केलेली डिश अत्यंत चवीने खाल्ली जाते, पण तेथे केवळ प्रशिक्षित शेफच ही डिश तयार करत असतात. हे शेफ या माशामधून विषारी पदार्थ हटविण्याकरता प्रशिक्षित असतात.
पफर मासा अत्यंत विषारी असतो आणि याच्या अनेक प्रजाती असतात. या माशामध्ये घातक टॉक्सिन असते, याचे विष सायनाइडपेक्षा 1200 पट अधिक विषारी असते. हा मासा प्रामुख्याने जपान, चीन, दक्षिण आफ्रिका, फिलिपाईन्स आणि मेक्सिको यासारख्या देशांमध्ये आढळून येतो. पफर माशाला ब्लोफिश म्हणूनही ओळखले जाते. हा मासा दिसण्यास एखाद्या चेंडूप्रमाणे असतो, तर त्याची त्वचा काटेदार असते.









