ग्रामीण भागातील 194 तलावांची निवड : ग्राम पंचायतीच्या उत्पन्नात भर : मत्स्य खात्याचे प्रोत्साहन
बेळगाव : ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या अनेक तलावांमध्ये मत्स्यपालन केले जाणार आहे. यासाठी शासनाकडून रितसर मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मत्स्यपालनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मत्स्यपालनाची सर्व जबाबदारी संबंधित ग्राम पंचायतींवर राहणार आहे. शिवाय यातून मिळणारा महसूलदेखील ग्राम पंचायतीला मिळणार आहे. त्यामुळे ग्राम पंचायतींच्या महसुलात साहजिकच वाढ होणार आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून अलीकडे कुक्कुटपालन, शेळीपालन, गो-पालन आणि मत्स्यपालन वाढले आहे. याला रोजगार हमीची जोड मिळत असल्याने तलावांची संख्या वाढत आहे. एकूण 485 ग्राम पंचायतींमध्ये 600 तलाव आहेत. यापैकी यंदाच्या हंगामात 194 तलावांमध्ये माशांची पिल्ले (मत्स्यबीज) सोडली जाणार आहेत. पावसाला सुरुवात झाल्याने तलावांतून पाणी साचू लागले आहे. त्यामुळे लवकरच तलावांतून मत्स्यबीज सोडले जाणार आहे. विशेषत: मत्स्यपालनातून मिळणारा पैसा ग्राम पंचायतींच्या वीजबिलांसाठी वापरला जाणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून ग्रामीण भागातील ग्राम पंचायतींचा मत्स्यपालनाचा प्रस्ताव रेंगाळला होता. मात्र, आता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी या प्रस्तावाला दुजोरा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ग्रामपंचायत हद्दीतील तलावात मत्स्योत्पादन होणार आहे. ग्रामपंचायत व्याप्तीत पडीक जमीन असलेल्या ठिकाणी तलावांची खोदाई करण्यात आली आहे. विशेषत: रोजगार हमी योजनेतून हे तलाव खोदण्यात आले आहेत. त्यामुळे रोहयो कामगारांना काम उपलब्ध झाले आहे. खोदलेल्या तलावांतून पाणीसाठा होऊ लागला आहे. दमदार पावसानंतर तलाव पूर्ण क्षमतेने भरतील. त्यानंतर मत्स्य खात्यामार्फत ग्राम पंचायतींना मत्स्यबीज वाटप केले जाणार आहे.
जिल्ह्यातील 600 तलाव ग्राम पंचायत मालकीचे आहेत. मात्र, यातील काही तलावात बारमाही पाणी राहात नाही. त्यामुळे अडचणी येणार आहेत. मात्र, यासाठीही वेगळी उपाययोजना खाते राबविणार आहे. मत्स्यपालन खात्यामार्फत प्रत्येक तलावात 4 हजारप्रमाणे एकूण 7 लाख 50 हजार मत्स्यबीज (माशांची पिल्ले) दिली जाणार आहेत. तलावांतील पाण्याचा अंदाज घेऊन संबंधित ग्राम पंचायतींनी माशांची पिल्ले सोडणे आवश्यक आहे. जिल्ह्यात जलाशय, नदी आणि तलावांतून मत्स्यपालन केले जाते. खात्याच्या अखत्यारित 221 तलावांपैकी 110 तलावात मत्स्यपालन होते. याबरोबरच हिडकल धरण, घटप्रभा, मलप्रभा, कृष्णा आणि मार्कंडेय नद्यांमध्येदेखील मत्स्यबीज सोडले जाणार आहे. अतिवृष्टी, रासायनिक खतांचा वाढता वापर आदी कारणांमुळे पडीक जमिनीचे क्षेत्र वाढू लागले आहे. अशा ठिकाणीही मत्स्यपालनाला प्राधान्य दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील निवड झालेल्या तलावांमध्ये राहू, गिरमल, मृगळ आणि कटला जातीच्या माशांची पिल्ले सोडली जाणार आहेत.
खात्यातर्फे प्रशिक्षण-मार्गदर्शन केले जाणार
485 ग्राम पंचायतींपैकी यंदाच्या हंगामात 194 तलावांची निवड करण्यात आली आहे. या तलावांमध्ये मत्स्यबीज सोडले जाणार आहे. देखभाल आणि इतर सर्व जबाबदारी संबंधित ग्राम पंचायतींची असणार आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीला यातून उत्पन्न प्राप्त होणार आहे. यासाठी खात्यामार्फत योग्य ते प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाणार आहे.
-वसंत हेगडे (सहसंचालक, मत्स्य खाते)









