रत्नागिरी :
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 टक्के कर लादल्याने भारताच्या मत्स्य व्यवसायाच्या निर्यातीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, या चिंतेच्या पार्श्वभूमीवर सरकारने सागरी खाद्यान्य निर्यातदारांना कोळंबी आणि इतर माशांच्या जातींसाठी पर्यायी बाजारपेठ शोधण्यास सांगितले. स्थानिक बाजारपेठेतील माशांच्या किंमतींवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
भारत सध्या अमेरिकेला गोठवलेल्या कोळंबी आणि कोळंबीचा आघाडीचा पुरवठादार आहे. त्याचा बाजारातील वाटा 2015 मध्ये 24.4 टक्क्यावरून 2024 मध्ये 40.6 टक्क्यापर्यंत वाढला आहे. वाढीव शुल्कामुळे अमेरिकेतील भारताच्या बाजारपेठेतील वाट्यावर परिणाम होणार असल्याने देशाला पर्यायी बाजारपेठांचा शोध घ्यावा लागेल. निर्यातदारांसाठी झालेल्या बैठकीत भारताच्या बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी रणनीती आखण्यात आली. यासाठी निवडलेल्या पर्यायी बाजारपेठांमध्ये इंग्लंड, युरोपियन युनियन (ईयू), ओमान, युएई, दक्षिण कोरिया, रशिया आणि चीन यांचा समावेश आहे.
भारताच्या वार्षिक मत्स्य उत्पादनात 104 टक्क्यांची उच्च वाढ झाली आहे, जी 2013-14 मध्ये जवळपास 96 लाख टनांवरून 2024-25 मध्ये 195 लाख टनांवर पोहोचली आहे. 2023-24 दरम्यान भारताने 17.81 लाख मेट्रिक टन सीफूड निर्यात केले, ज्याची किंमत 60,524 कोटी ऊपये (7.38 अब्ज डॉलर्स) होती. गोठवलेले कोळंबी हे भारतातील सीफूड निर्यातीत सर्वात महत्वाचे उत्पादन राहिले, ज्याने 40,013 कोटी ऊपये (4.88 अब्ज डॉलर्स) कमावले.
अमेरिकन प्रशासनाने भारतीय सीफूडवर लादलेल्या मोठ्या शुल्कामुळे निर्माण झालेल्या संकटाला प्रतिसाद म्हणून भारत सरकार देशांतर्गत वापर वाढवण्यासाठी आणि सीफूड क्षेत्रासाठी नवीन निर्यात बाजारपेठ शोधण्यासाठी काम करत आहे. सर्व सीफूड निर्यातीपैकी सुमारे 75 टक्के निर्यात केवळ आंध्रप्रदेशातून होते, त्यानंतर केरळ, गुजरात आणि ओडिशा यांचा क्रमांक लागतो. सीफूड गोठलेले कोळंबी, गोठलेले मासे, ऑक्टोपस, सुरीमी, लॉबस्टर, कटलफिश, सुके मासे आणि फिश मील यांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या शुल्काच्या परिणामाबद्दल विचारले असता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत मासे आणि सीफूड निर्यात करतो, त्या 130 देशांपैकी अमेरिका हा एक आहे. आम्ही लवकरच ही परिस्थिती हाताळू. अमेरिकेने आयात शुल्कात वाढ केल्याने भारतीय मत्स्य निर्यातदारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील मत्स्य व्यवसाय पावसाळ्dयामुळे बंद आहे. सप्टेंबरनंतर हा व्यवसाय सुरू झाल्यावर गतवर्षीच्या तुलनेत माशांचे दर घसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निर्यातदारांनी पर्यायी मार्ग शोधले तरी अमेरिकेएवढी किंमत मिळेल, असे सांगता येत नाही. या पार्श्वभूमीवर मच्छीमारीचा व्यवसाय अधिक जोखीमग्रस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे.








