वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या 10 व्या प्रो-कबड्डी लिग हंगामात अर्जुन देसवालच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर जयपूर पिंक पँथर्सने आपला पहिला विजय नोंदविताना गुजरात जायंट्सचा 35-32 अशा 3 गुणांच्या फरकाने पराभव केला.
येथील श्री कंठिरेवा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मध्यंतरापर्यंत जयपूर पिंक पँथर्स पिछाडीवर होता. गुजराज जायंट्सने सामन्याच्या मध्यंतरापर्यंत 20-12 अशी भक्कम आघाडी मिळविली होती. या संपूर्ण सामन्यात 15 गुण मिळविणाऱ्या अर्जुन देसवालने प्रो-कब•ाr लिग स्पर्धेत आपला विक्रमी 700 वा गुण नोंदविला. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या 7 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघ 5-5 असे बरोबरीत होते. त्यानंतर सोनूने आपल्या सुपर रेडवर गुजरात जायंट्सला 8-5 अशी आघाडी मिळवून दिली. 10 व्या मिनिटाला जयपूर पिंक पँथर्सचे सर्व गडी बाद झाल्याने गुजरात जायंट्सने आपली आघाडी अधिक वाढविली. यावेळी गुजरातचा संघ 18-10 असा आघाडीवर होता. मध्यंतरावेळी गुजरात जायंट्सने जयपूर पिंक पँथर्सवर 20-12 अशी बडत मिळविली होती. मात्र सामन्याच्या उत्तरार्धात अर्जुन देसवालच्या खेळीने चित्र पालटले. 27 व्या मिनिटाला देसवालने आपल्या सुपर रेडवर गुजरात जायंट्सचे गडी बाद केले. 31 व्या मिनिटाला जयपूर पिंक पँथर्सने गुजरातवर 26-25 अशी केवळ एका गुणाची आघाडी मिळविली होती. दरम्यान देसवालने शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपला 700 वा विक्रमी गुण नोंदविल्याने जयपूर पिंक पँथर्सने हा सामना 35-32 अशा 3 गुणांच्या फरकाने जिंकला.









