विशेष प्रतिनिधी / सांगली
Sangli News : मान्सूनचा पहिला आठवडा जिल्ह्याच्या दृष्टीने कोरडा गेला असून मुंबई हवामान विभागाने जाहीर केल्यानुसार येथे पाच दिवस जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता नाही. बुधवार, गुरुवारी तर हवामान कोरडे राहील. त्यानंतर तुरळक पाऊस पडू शकतो.
गेले दोन दिवस मान्सून रत्नागिरी जवळच अडला असून तो पुणे मुंबई पर्यंत तातडीने पोहोचेल अशी हवामान विभागाची आशा आहे. मात्र चक्रीवादळाने बाष्प खेचून घेतल्याने पहिल्या आठवड्यात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडलेलाच नाही. जिल्ह्यातील छोट्या मोठ्या ८३ तलावा पैकी 20 कोरडे पडले आहेत. तर उर्वरितांची पाणी पातळी झपाट्याने घटत आहे.
विदर्भातील जिल्ह्यात येलो अलर्ट दिल्यामुळे तिकडे वादळी पाऊस होऊ शकतो. सांगली जिल्ह्यात मात्र तुरळक पाऊस पडेल का? याबाबतही साशंकता आहे.
मंगळवार दिनांक 13 जून रोजी सांगली जिल्ह्यात तुरळक पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज होता. मात्र सायंकाळपर्यंत तरी कोठूनही पावसाचे वृत्त नाही. 14 आणि 15 जून रोजी हवामान कोरडे राहील असा अंदाज असून 16 आणि 17 जून रोजी तुरळक पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यातील तापमानाचा अंदाज घेतला असता कमाल 34 आणि किमान 24 अंश सेल्सिअस असे एक सारखे तापमान पुढचे पाच दिवस असणार आहे. यादरम्यान वाऱ्याची गती प्रति तास 25 ते 29 किमी इतकी असेल. रत्नागिरीत मान्सून पोहोचला तरी इथले वातावरण अद्याप बदलले नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
खरीप आणखी लांबला
सात जून या तारखेला पाऊस पडतच नाही हे अलीकडे शेतकऱ्यांच्याही अंगवळणी पडले असले तरी ते खरिपाच्या तयारीला लागलेले असतात. पहिला आठवडा संपत आला तरी पावसाची चाहूल नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जिल्ह्यात गेले महिनाभर ताकारी म्हैसाळ टेंभू वाकुर्डे या योजना सुरू असल्यामुळे पूर्वीच्या दुष्काळी पट्ट्यात सध्या चांगली स्थिती असली तरी आहे त्या पाण्याचे आवर्तन पाटबंधारे विभागाने अंशतः सुरू ठेवले आहे. परिणामी भविष्यात पाणी पुरणार असेल तरच धाडस करायचे या भूमिकेत शेतकरी आहेत. त्यांना शासकीय यंत्रणेमार्फत मार्गदर्शन मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
तलावांचा पाणीसाठा घटू लागला
सांगली जिल्ह्याचे पाणी नियोजन कोयना आणि चांदोली (वारणा) धरणावर अवलंबून असते. तिथे अनुक्रमे 12.37 आणि 11.76 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तापमानातील वाट लक्षात घेऊन तो भविष्यात महापालिका नगरपालिका ग्रामपंचायती आणि इतर पाणी योजनांना पुरवणे गरजेचे आहे. त्यामुळे हे पाणी पुरवून वापरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील 5 मोठे तलाव आणि 78 लघु प्रकल्पात 45.72 दक्ष लक्ष घनफूट इतकाच पाणीसाठा आहे. त्यातीलही उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी 8 जून रोजी 21 टक्के होती असा पाटबंधारे विभागाचा अहवाल सांगतो. याच तारखेला गेल्यावर्षी 27 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. 83 प्रकल्पांपैकी केवळ दोन प्रकल्प पूर्ण भरलेले आहेत. तीन प्रकल्प 75 टक्के आणि तेवढेच प्रकल्प 50 ते 75 टक्के भरलेले आहेत. 25 ते 50 टक्के यादरम्यान 14 प्रकल्प तर 25 टक्क्याहून कमी साठा असलेले 40 प्रकल्प आहेत. 1 तलाव पूर्ण कोरडा तर 20 तलावांची पाणी स्थिती मृतावस्थेला पोहोचलेली आहे. प्रशासनाने पाणी वाचवण्याचे आवाहन चालवले आहे तर शेतकरी आणि सर्वसामान्य जनता पाऊस लवकर पडण्याची विनवणी करत आहेत.








