खेड :
तालुक्यातील घेरारसाळगड–बुथराईवाडीतील एकमेव विहीर आटली असून तलावही कोरडा पडला आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. पाणी टंचाईची ही भीषणता लक्षात घेता बुधवार 2 एप्रिल रोजी घेरारसाळगड–बुथराईवाडीत तालुक्यातील पहिला पाणी टँकर धावणार आहे. पंचायत समितीच्या पाणी विभागाकडून टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.
घेरारसाळगड–बुथराईवाडीत घरांची संख्या 11 च्या आसपास असून 43 इतकी लोकवस्ती आहे. येथील ग्रामस्थांची तहान 1200 लिटर क्षमतेच्या विहिरीवर भागवली जात होती. कडक उष्म्यामुळे विहिर पूर्णत: आटली आहे. पर्याय असलेल्या तलावातील पाणीसाठ्यातही घट झाली आहे. त्यामुळे येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून दाखला प्राप्त झाला आहे. यापाठोपाठ खवटी–खालची धनगरवाडी व चिरणी–धनगरवाडीलाही टँकरने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात दाखला प्राप्त करण्यासाठी पंचायत समितीच्या पाणी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचा पाणी विभागही सतर्क झाला आहे. रणरणत्या उन्हामुळे जिल्ह्यातील नद्या, विहिरीतील पाणीसाठ्यात घट होते आहे. खेड तालुक्यातील धनगरवाड्यांना पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसत आहे. चिरणी–धनगरवाडी, वावेतर्फे–ढेबेवाडी, खवटी–खालची धनगरवाडी येथील ग्रामस्थांचे पाणी टँकरसाठी अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.








