दुचाकी चालक ठार, पत्नी जखमी
वास्को : झुआरी नदीवरील नवीन पुलावर कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला. तर त्याची पत्नी गंभीररीत्या जखमी झाली. मयत दुचाकी चालकाचे नाव रूझारीया डिसोजा (61) असे आहे. तर पत्नीचे नाव क्रिस्टिना (55) असे असून हे दांपत्य बाणावलीतील राहणारे आहे. या अपघातामुळे झुआरीच्या नवीन पुलावर पहिल्या अपघाती बळीची नोंद झाली आहे. वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात सकाळी साडे अकराच्या सुमारास झाला. बाणावलीतील डिसोजा दांपत्य स्कुटरवरून पणजीच्या दिशेने जात होते. कुठ्ठाळीतील झुआरीच्या नवीन पुलावर पोहोचताच मागून येणाऱ्या एका रॅन्ट अ कारने त्यांना धडक दिली. त्यामुळे हे दांपत्य रस्त्यावर आपटले. त्यात चालक रूझारियोला जागीच मृत्यू आला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. दोघानाही त्वरीत गोमेकॉमध्ये हलवण्यात आले. मात्र, चालकाला मृत घोषीत करण्यात आले. वेर्णा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरलेली रॅट अ कार ही स्विफ्ट कार असून ही कार पर्यटक चालवत होता. पोलिसांनी कार व चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. झुआरीच्या नवीन पुलावर आतापर्यंत काही किरकोळ अपघात झालेले आहेत. मात्र, या पुलावर बळी घेणारा हा पहिला अपघात ठरलेला आहे.









