मानवाचे जग हे खरोखरच अद्भूत आहे. कोणता मानव कोणत्या उद्देशाने काय करेल आणि कोणते उपाय शोधून काढेल, हे भल्याभल्यानांही सुचणे कठीण आहे. आपला व्यवसाय चांगला चालावा यासाठी तर अतिशय अजब कल्पना काहीजण आचरणात आणतात. ऑस्ट्रेलिया या देशात एक हॉटेल असे आहे, की जेथे ग्राहकाचा उघडपणे अपमान केला जातो. त्याला अक्षरश: शिव्या दिल्या जातात आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून ऑर्डर घेतली जाते आणि त्याला त्याच्या इच्छेनुसार खाणे-पिणे किंवा जेवण दिले जाते. ग्राहकही या हॉटेलात प्रथम अपमान करुन घेण्यासाठीच जातात. तेथे जाऊन शिव्या खाणे त्यांना चांगले वाटते.
ग्राहक या हॉटेलात आले, की त्याचा अपमान केला जातो. हॉटेलातील वेटर्स त्याला शिव्या देतात. अत्यंत वाईट असे अपशब्द त्याच्यासंबंधात उपयोगात आणले जातात. त्याने त्याला हव्या असलेल्या पदार्थांची सूची दिली असेल, तर ती फेकून दिली जाते. नंतर त्याचा शाब्दिक अवमान केला जातो. एवढेच नाही, तर अपमानास्पद शब्द लिहिलेली टोपी परिधान करण्यास त्याला भाग पाडले जाते. एवढे सगळे झाल्यानंतर त्यांचा ऑर्डर स्वीकारली जाते आणि त्याला खाणे दिले जाते. अनेक वर्षांपासून ही प्रथा आहे. लोक यासंबंधात महादाश्चर्य व्यक्त करतात.
या विचित्र हॉटेलचे नाव ‘करेन डायनर’ असे आहे. ग्राहकांना हीन दर्जाची वागणूक देऊनही येधे मोठ्या संख्येने लोक का जातात, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मानसशास्त्रज्ञांनी याचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे .त्यांच्या म्हणण्यानुसार काही जणांना, विशेषत: तरुण पिढीतील काही जणांना जाणून बुजून स्वत:चा अपमान करुन घेण्यातच आनंद वाटतो. त्यांचा मानसिक तणाव हलका होतो. अपशब्द उच्चारुन भावनेला वाट मोकळी करुन देण्याने ज्याप्रमाणे तणाव हलका होऊ शकतो, तसे अपमान करुन घेतल्यानेही तणावमुक्त होता येते. नेमकी हीच मानसिकता या हॉटेलमालकाने हेरली आणि हा व्यवसाय हाती घेतला आहे.









