तेलंगणात सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचा प्रचाराचा रोख गेल्या काही दिवसांमध्ये बदलल्याचे दिसून येत आहे. प्रचाराच्या पूर्वार्धात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि पक्षाचे इतर प्रचारक यांच्याकडून प्रचारात राज्यात झालेली विकासकामे, लोकांना या सरकारने मिळवून दिलेले लाभ आणि सवलती यांवर भर दिला जात होता. आपल्या गेल्या 10 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा देण्यावर राव यांनी मोठी भिस्त ठेवली होती. पण आता त्यांचा कल परिवर्तित झाला आहे.
आता राव प्रामुख्याने काँग्रेसवर टीका करीत आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यास राज्यात कायकाय उत्पात घडतील यांच्या शक्यता ते वर्तवित आहेत. आपल्या पक्षाला लोकांनी पुन्हा संधी दिली नाही, तर त्यांची आणि राज्याची कशी हानी होणार आहे, यासंबंधी ते प्रामुख्याने प्रचार करताना दिसून येतात.
कारण काय ?
प्रचाराचा रोख बदण्याचे कारण काय, हा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडला आहे. राज्यात काँग्रेसचा प्रभाव वाढत असल्याने राव यांनी प्रचार धोरणात हा बदल केला आहे काय, अशी शंकाही काही राजकीय अभ्यासक व्यक्त करीत आहेत. काँग्रेसने ही निवडणूक गांभीर्याने लढविण्याची घोषणा केली आहे. तसेच मतदारांवर अवास्तव आश्वासनांचा पाऊसही पाडला आहे. त्यामुळे राव यांच्यासमोर आव्हान उभे राहिल्याचे काही काँग्रेस समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे राव यांना आता केवळ आपल्या कार्यापेक्षा काँग्रेसवर टीका करावी लागत असल्याचे सांगितले जाते.
बीआरएसकडून वेगळे कारण
तथापि, भारत राष्ट्र समितीच्या म्हणण्यानुसार रोख बदलण्याचे कारण हे नाही. लोकांना या सरकारने केलेल्या कामांचा चांगलाच परिचय आहे. त्यामुळे लोकांना माहीत असलेलेच मुद्दे पुन्हा सांगण्यात अर्थ नाही. त्याऐवजी काँग्रेस राज्याचे कसे वाटोळे करणार आहे, हे बिंबविणे आवश्यक आहे, असे या पक्षाचे म्हणणे आहे. आता मतदार कोणाचे खरे मानतात हे 3 डिसेंबरला समजणार आहे.









