जगदीश शेट्टर यांना राजकुमार टोपण्णावर यांचा टोला
प्रतिनिधी/ बेळगाव
भाजपच्या राजवटीत बेळगाव येथील बुडामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. यासंदर्भात खासदार जगदीश शेट्टर यांनी एक शब्दही काढला नाही. त्यांना म्हैसूर येथील मुडामधील भ्रष्टाचारासंदर्भात बोलण्याचा अधिकार नाही, असा टोला राजकुमार टोपण्णावर यांनी हाणला आहे.
बेळगावमधील भाजप नेत्यांनी बुडा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लिलाव न करताच नियम धाब्यावर बसवून भूखंड वाटप केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. खरे तर हे प्रकरण बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येते. जगदीश शेट्टर यांना याचा विसर पडला आहे का? असा प्रश्नही राजकुमार यांनी उपस्थित केला आहे.
यासंबंधी शनिवारी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून म्हैसूरमध्ये मुडामधील भ्रष्टाचारासंदर्भात जगदीश शेट्टर यांनी वक्तव्य केले आहे. बेळगाव येथील बुडा, स्मार्ट सिटी व इतर शासकीय योजनांत भ्रष्टाचार कसा झाला आहे? हे लोक ओळखून आहेत. जगदीश शेट्टर यांनी बोलायचे असेल तर आधी बुडामधील भ्रष्टाचारासंदर्भात बोलावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
बेळगाव येथील भाजी मार्केटच्या प्रकरणात एपीएमसीवर अन्याय झाला आहे. या अन्यायाविरोधात खासदार जगदीश शेट्टर यांनी आवाज उठवावा. त्यांना शेतकऱ्यांची काळजी असेल तर आजवर बेळगाव परिसरात भाजपच्या राजवटीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणांवर त्यांनी प्रकाश टाकावा, असा सल्लाही खासदार जगदीश शेट्टर यांना दिला आहे









