ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आज होतेय. पण देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लाल महालात झाला. शिवरायांनी लाल महलात शाहिस्तेखानाची बोटं कापली. हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायांनी रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. अशा शब्दात शरद पवारांनी शिवरायांच्या कार्याची महती सांगितली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास संपूर्ण जगाला माहिती आहे. त्यांचा जन्म याच जिल्ह्यात, याच शहरात झाला. त्यांनी येथे आपले बालपण घालवले. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवाजी महाराज लढले. या देशात महाराष्ट्राचा इतिहास वेगळा आहे. लोकमान्य टिळकांचे विचारही विसरुन चालणार नाही. टिळकांचे विचार कालसुसंगत होते. स्वातंत्र्यलढय़ात नवसंजीवनी ओतण्याचे काम त्यांनी केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांना घाम फोडला.
आजच्या टिळक पुरस्काराला एक आगळे वेगळे महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला पुरस्कार याआधी अनेक मान्यवरांना मिळाला आहे. आता याच पंगतीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश झाला. याचा आपल्या सर्वांना आनंद आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींचे पवारांनी अभिनंदन केले.








