अमेरिकेच्या टेनेसी प्रांतातील एका प्राणिसंग्रहालयात असा जिराफ जन्माला आला आहे, ज्याच्या शरीरावर कुठलेच ठिपके नाहीत. याला जगातील पहिला स्पॉटलेस जिराफ म्हटले जात आहे. याचा रंग पूर्णपणे ब्राउन आहे. विशेष म्हणजे या जिराफाच्या आईच्या शरीरावर सर्वसामान्य जिराफांप्रमाणे ठिपके आहेत. जन्माला आलेल्या जिराफाचे नाव ठेवण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने सोशल मीडियाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे जिराफ अत्यंत अनोखे असल्याने त्याचे नाव देखील अनोखे असायला हवे असे प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून म्हटले गेले आहे.

या जिराफाचा जन्म 31 जुलै रोजी झाला असला तरीही याची अधिकृत माहिती आता समोर आली आहे. ही मादी जिराफ असून ब्राइट प्राणिसंग्रहालयात जन्माला आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जगात कुठल्याही पट्ट्यांशिवाय एकही जिराफ नाही असे सांगण्यात आले आहे.
या जिराफाची उंची सुमारे 6 फूट असून प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाकडून त्याला विशेष सुविधा पुरविण्यासह देखभाल केली जात आहे. अखेर ही मादी जिराफ कुठल्याही पट्ट्यांशिवाय कशी जन्माला आली हे तज्ञांनाही सांगता आलेले नाही.
टेनेसीत प्रत्येक जिराफाची विशेष काळजी घेतली जाते. सर्वाधिक जिराफ आफ्रिकेत आढळतात, परंतु तेथे त्यांची शिकार होत असल्याने त्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे. जेव्हा या मादी जिराफाचा जन्म झाला आहे, तेव्हापासून जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये त्याला स्थान मिळाले आहे. याचमुळे आम्हाला त्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी लागत असल्याचे ब्राइट प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आले.

जगात 30 वर्षांच्या कालावधीत 40 टक्के जिराफ कमी झाले आहेत. जन्माला आलेल्या मादी जिराफाचे नामकरण करण्यासाठी आम्ही एक स्पर्धा सुरू केली आहे. किपकी या नावावर सध्या विचार सुरू असून याचा अर्थ युनिक असा होतो. याचबरोबर आणखी एक नाव समोर आले असून ते जामेला असे आहे. याचा अर्थ सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक असा होतो असे प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाने म्हटले आहे.









