सांगली :
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून सांगली जिह्यातील पहिला चार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प बसरगी (ता. जत) येथे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे बसरगी, सिंदुर व गुगवाड या गावांतील 1100 शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.
कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजना राबविण्यात येत आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या 16 हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रीत ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या शृंखलेतील हा सांगली जिह्यातील पहिला प्रकल्प आहे.
कोल्हापूर व सांगली जिह्यात 88 प्रकल्प प्रस्तावित
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत कोल्हापूर जिह्यात 54 ठिकाणी (एकूण क्षमता 170 मेगावॅट) व सांगली जिह्यात 34 ठिकाणी (एकूण क्षमता 207 मेगावॅट) सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या दोन्ही जिह्यातील प्रकल्पांची एका†त्रत क्षमता 377 मेगावॅट आहे. या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 75 कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी देखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत जिह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे व त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय टीमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जिह्यातील गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भूमी अभिलेख कार्यालय व जिल्हा परिषद यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. अशा सौर प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून एकरकमी पाच लाख अनुदान देण्यात येत आहे.








