शहरातील सर्व मंदिरांमध्ये मंगलमय वातावरण : दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर भाविकांनी फुलले : प्राचीन शिवपंचायतन देवस्थानात लघुरुद्राभिषेक
बेळगाव : व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि नागपंचमी शहरात भक्तिभावाने साजरी करण्यात आली. दोन महत्त्वाचे सण एकाच दिवशी आल्याने शहरातील सर्व मंदिरांमध्ये मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरामध्ये श्रावणमासामध्ये दररोज विशेष पूजा केली जाते. श्रावण सोमवारी तीन वेळा अभिषेक केला जातो. पहिल्या सोमवारनिमित्त रविवारी रात्रीपासूनच महादेवाच्या पिंडीवर पंचामृत अभिषेक करण्यात आला. सायंकाळी 5 ते 11 या वेळेत विशेष रुद्राभिषेक पार पडला. यंदा कपिलेश्वर मंदिरामध्ये अष्टकुल नागदेवतेची मूर्ती उभारण्यात आली आहे. नागपंचमीनिमित्त तिचीही विशेष पूजा आणि महाआरती करण्यात आली. श्रावण सोमवारनिमित्त त्रिकाल पूजा करण्यात आली. सोमवारी पहाटे 6, दुपारी 12 व संध्याकाळी 4 असे तीन वेळा मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. सायंकाळी 7 वाजता पालखी प्रदक्षिणा झाली. श्रावण सोमवारनिमित्त कपिलेश्वराचे दर्शन घेण्यासाठी तसेच या मंदिरात असलेल्या नागप्रतिमांच्या दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती.
चव्हाट गल्ली
सालाबादप्रमाणे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी चव्हाट गल्लीतील सर्व देवस्थानात पूजा करून गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त चव्हाटा मंदिर येथे पूजा करून या विधीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ढोरवाडा येथे चव्हाटा मंदिरात, नंतर कल्याण चौक येथील गणेश मंदिरात, ज्योतिर्लिंग देवस्थान, देवदादा सासनकाठी (देवघर), त्यानंतर मारुती मंदिरात पूजा करून हा विधी समाप्त झाला. या कार्यक्रमात पंच मंडळ, महिला मंडळ, युवावर्ग व सर्व भक्त मंडळ सहभागी झाले होते.
मारुती मंदिर, मारुती गल्ली
श्रावण मासानिमित्त पहिल्या सोमवारनिमित्त मारुती गल्लीतील अध्यापक कुटुंबीयांच्या मारुती मंदिरात असणाऱ्या प्राचीन श्री शिवपंचायतन देवस्थानात लघुरुद्राभिषेक पार पडला. या मंदिराचा अलीकडेच आदित्य अध्यापक यांनी जीर्णोद्धार केला आहे. मंदिराचे विश्वस्त व पुजारी प्रकाश अध्यापक यांच्या हस्ते लघुरुद्राभिषेक करण्यात आला. वे.शा.सं. अकरा ब्राह्मणांनी रुद्रपठण केले. लघुरुद्राभिषेकानंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर तीर्थप्रसाद वितरण करण्यात आला. यावेळी मंदिराचे सर्व विश्वस्त उपस्थित होते श्रावण सोमवारबरोबरच शहरात नागपंचमीसुद्धा उत्साहाने साजरी करण्यात आली. महिलांनी घरांच्या प्रवेशद्वारासमोर नागाची रांगोळी रेखाटून त्यामध्ये रंग भरले. त्यानंतर अनेक भाविकांनी कपिलेश्वर मंदिरासह ठिकठिकाणी असलेल्या नागदेवतांच्या प्रतिमांची पूजा केली. बाजारपेठेत असलेल्या नागप्रतिमा घरी आणून त्यांचीही विधिवत पूजा करण्यात आली. रविवारी नागचवथी साजरी झाली. काही समाजामध्ये अळूच्या पानावरून नागप्रतिमा आणण्याची प्रथा आहे. त्यामुळे बाजारपेठेत रविवारी व सोमवारी अळूची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. नागपंचमीला लाह्या आणि भाजके हरभरे यांचा नैवेद्य आवर्जून दाखविला जात असल्याने चुरमुरे भट्टीमध्ये यांची खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. नागपंचमीला आजही महिलावर्ग आवर्जून बांगड्या भरतो आणि मेंदी रेखाटन करतो. त्यामुळे कासारांच्या दुकानांमध्ये महिलांची गर्दी झाली होती. नोकरदार महिलांचा विचार करून असंख्य विक्रेत्यांनी ठिकठिकाणी चुरमुरे, बुंदी, राजगिरा, पोह्यांच्या लाडवांचे स्टॉल मांडले होते.









