वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येत्या ऑक्टोबरमध्ये येथील यमुना क्रीडा संकुलात होणाऱ्या पहिल्याच प्रीमियर लीग तिरंदाजी स्पर्धेत दीपिका कुमारी, धीरज बोमदेवरा, ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा यांच्यासह अन्य भारतीय अव्वल तिरंदाजपटू सहभागी होत आहेत. ही स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवर खेळविली जाणार असून यामध्ये सहा फ्रांचयझींचा समावेश राहील.
11 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विश्व तिरंदाजी संघटना तसेच आशियाई तिरंदाजी फेडरेशनने आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. या स्पर्धेमध्ये अव्वल आंतरराष्ट्रीय तिरंदाजपटूही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. देशातील तसेच विदेशातील रिकर्व्ह आणि कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातील तिरंदाजपटू या स्पर्धेत एकत्रित येत आहेत. लवकरच आंतरराष्ट्रीय तिरंदाजपटूंची नावे जाहीर केली जातील. तथापि, सहा फ्रांचायझी जागतिक दर्जाच्या तिरंदाजपटूंना खरेदी करतील. पण ही स्पर्धा पहिल्यांदाच होत असल्याने यावेळी तिरंदाजपटूंच्या लिलाव पद्धती ऐवजी ड्राफ्ट पद्धत अवलंबली जाणार आहे.
सहा फ्रांचायझींचे सहा संघ राहतील. प्रत्येक फ्रांचायझीकडे 8 सदस्य राहतील. यामध्ये चार महिला आणि चार पुरुषांचा समावेश राहील. या सहा फ्रांचायझींना आपल्या संघांसाठी दोन विदेशी तिरंदाजपटूंना घेण्याची मुभा राहील. यमुना क्रीडा संकुलामध्ये ही स्पर्धा प्रकाशझोतामध्ये घेतली जाईल. रिकर्व्ह आणि कंपाऊंड प्रकारातील तिरंदाजपटूंना अनुक्रमे 70 मी. आणि 50 मी. असे अंतर राहील. फ्रांचायझींकडून भारतीय तिरंदाजपटूंची निवड त्यांच्या विश्व मानांकनाच्या आधारे केली जाईल. अलिकडेच रिकर्व्ह प्रकारात भारतीय तिरंदाजपटूंसाठी निवड चाचणी स्पर्धा घेतली गेली. त्यामध्ये महिलांच्या विभागात तृतिय मानांकीत दीपिका कुमारी आणि पुरूषांच्या विभागात 14 वा मानांकीत धीरज अव्वल स्थानी राहील. रिकर्व्ह प्रकारात महिलांच्या विभागात अंकिता भक्त, भजन कौर तसेच पुरुषांच्या विभागात निरज चौहान, राहुल, रोहीत कुमार, मृणाल चौहान, सचिन गुप्ता आणि कृषकुमार यांना विविध फ्रांचायझी निवडण्याचा प्रयत्न करतील.
कंपाऊंड तिरंदाजी प्रकारामध्ये भारताची विश्वविक्रमवीर तिरंदाजपटू ज्योती सुरेखा वेन्नम (तृतिय मानांकीत) आणि पुरुषांच्या विभागात ऋभष यादव हे अव्वल स्थानी राहतील. दहावा मानांकीत अभिषेक, 11 मानांकीत प्रथमेश फुगे, सोळावा मानांकीत प्रियांश, सतरावा मानांकीत परणीत कौर यांचा समावेश राहील. पुरुषांच्या विभागात अमन सैनी, ओजस देवतळे, साहील जाधव, सी. जिग्नास यांचा तर महिलांच्या विभागात प्रितीका प्रदीप, अवनित कौर, मधुरा धामणगावकर यांचा सहभाग राहील.









