मंत्री उदय सामंत खासगी विमानाने तिरुपतीकडे रवाना
वार्ताहर/गोकुळ शिरगाव
गेल्या पंधरा दिवसापासून कोल्हापूर विमानतळाची नाईट लँडिंग व टेक ऑफ सुविधा चालू झाली आहे. पण आज प्रथमच टेकऑफ करत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यशस्वी सुरुवात केली. आज विमानतळ पूर्ण क्षमतेने यशस्वी झाल्याचे विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी अनिल शिंदे यांनी सांगितले. खासगी विमानाने उद्योगमंत्री उदय सामंत व त्यांचा परिवार असे एकूण सहा ते सात जण मिळून यांना घेऊन रात्री आठ पंचेचाळीस वाजता हे विमान तिरुपतीला गेले.
विमानाचे नाईट लँडिंग सुरु झाल्याने कोल्हापूरमध्ये येणाऱ्या उद्योजकांसाठी, त्याचबरोबर पर्यटनासाठी, शिवाय शैक्षणिक धोरणासाठी या नाईट लँडिंग सुविधेचा कोल्हापूरसाठी खूप मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, मंत्री सामंत यांनी तिरुपतीला जाण्यासाठी रविवारी विमानाचे टेकऑफ करणार असल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनाला शनिवारी दिली. यानुसार व्यवस्थापनाने तयारी केली. मुंबईहून रविवारी सकाळी खासगी विमान कोल्हापूरात आले. त्यानंतर रात्री 8.45 मिनिटांनी त्यांच्या विमानाने तिरुपतीच्या दिशेने उड्डाण केले.
कोल्हापूरातील उद्योग आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी झेप घेत आहेत. यामध्ये गोकुळ शिरगाव एमआयडीसी, शिरोली एमआयडीसी ’कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत या ठिकाणी परकीय गुंतवणूक मोठ्य़ा प्रमाणात वाढत आहे. या नाईट लँडिंगच्या सुविधेने विमानसेवेची गती वाढणार आहे. उद्योजक, व्यावसायिक आणि विविध कंपन्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. – अनिल शिंदे, विमानतळ व्यवस्थापक









