22 फेब्रुवारीला कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा चर्चा : एमएसपीच्या कायदेशीर हमीवर विचार
वृत्तसंस्था/ चंदीगड
गेल्या एक वर्षापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी केंद्रीय प्रतिनिधींसोबत बैठक झाली. ही बैठक चंदीगडमध्ये पार पडली असून पुढील बैठक 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथक आणि शेतकरी नेत्यांनी एमएसपीसह अनेक मुद्यांवर चर्चा केली. पहिल्या बैठकीत बऱ्याच मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून पुढील बैठकीत कृषिमंत्री शिवराज चौहान आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहतील. ही बैठक चंदीगड किंवा दिल्ली येथे होऊ शकते, असे शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी बैठकीनंतर सांगितले.
आंदोलक शेतकऱ्यांची केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी झालेली शुक्रवारची बैठक चंदीगडमधील महात्मा गांधी राज्य सार्वजनिक प्रशासन संस्थेत आयोजित करण्यात आली होती. केंद्र सरकारच्यावतीने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी या बैठकीला उपस्थित होते. तसेच पंजाबचे कृषिमंत्री गुरमीत सिंग खुदियान आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री लालचंद कटारुचक, मुख्य सचिव केएपी सिन्हा आणि डीजीपी गौरव यादव यांचाही समावेश होता. त्याव्यतिरिक्त या शिष्टमंडळात शेतकरी चळवळीचे नेतृत्व करणारे संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाचे 28 सदस्यीय नेते होते. केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विविध शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. बैठकीत विशेषत: पिकांवरील किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) कायदेशीर हमीवर चर्चा झाली.
शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, ‘आज सर्व मुद्यांवर चर्चा झाली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या शांततेत ऐकल्या आहेत. पुढील बैठक 22 फेब्रुवारी रोजी शिवराज चौहान यांच्या नेतृत्वाखाली होईल. पुढील बैठकीला शिवराज सिंह चौहान स्वत: उपस्थित राहतील असे केंद्रीय मंत्री म्हणाले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 28 सदस्यीय शेतकरी नेते केंद्रीय नेत्यांना भेटले. आम्ही कागदपत्रांसह वस्तुस्थिती सादर केली आहे. मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला कोणतेही उत्तर दिले नाही. पुढील बैठकीत उत्तराची अपेक्षा असल्याचे शेतकरी नेते अभिमन्यू कोहाड यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
डल्लेवाल रुग्णवाहिकेतून बैठकीला हजर
एमएसपीची कायदेशीर हमी आणि इतर मागण्यांसाठी खानौरीमध्ये 80 दिवसांपासून आमरण उपोषण करणारे जगजीतसिंग डल्लेवाल हेदेखील बैठकीला उपस्थित होते. त्यांना रुग्णवाहिकेतून चंदीगडला आणण्यात आले होते. दुपारी 3 वाजताच्या सुमारास केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी शेतकऱ्यांची बैठक घेण्यासाठी चंदीगडला पोहोचले. ही बैठक संध्याकाळी पाच वाजता सुरू झाली. बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी डल्लेवाल यांना उपोषण मागे घेण्याची पुन्हा एकदा कळकळीची विनंती केली. पण, त्यांनी सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणापासून मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले.









