बेळगाव उत्तर, दक्षिण वेटींगवर काँग्रेसकडून लक्ष्मी हेब्बाळकर यांना बेळगाव ग्रामीणमधून, चिकोडीत गणेश, निपाणी वेटींगवर
प्रतिनिधी/ बेंगळूर
तीव्र कुतूहल निर्माण झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विद्यमान 61 आमदारांसह एकूण 124 मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. चिकोडी-सदलगा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार गणेश हुक्केरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, लक्ष केंद्रीत झालेल्या निपाणी मतदारसंघातून कोणाला तिकीट द्यावे, याबाबत काँग्रेसश्रेष्ठींनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.

राज्यातील 6 विद्यमान आमदारांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. या मतदारसंघांमध्ये एकापेक्षा अधिक जण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याने तेथे कोणाला तिकीट द्यावे, याबाबतचा निर्णय स्थानिक नेत्यांशी चर्चा करून घेतला जाणार आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत कोणाकोणाला स्थान मिळेल, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे प्रमुख मुकुल वासनिक यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात असलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. तर प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना कनकपूरमधून तिकीट दिले आहे. माजी केंद्रीयमंत्री के. एच. मुनियप्पा हे राज्य राजकारणात परतले असून ते प्रथमच विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत.
जातनिहाय उमेदवारांची संख्या
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी 124 उमेदवारांची नावे जाहीर करताना वीरशैव-लिंगायत समुदायाला झुकते माप दिले आहे. सत्ताधारी भाजपचे पारंपरिक मतांवर लक्ष ठेवून काँग्रेसने या समुदायातील 32 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वक्कलिग समुदायाला 25, अनुसूचित जाती 22, अनुसूचित जमाती 10, मराठा 2, ब्राह्मण 5, कुरुब (धनगर) 2, रजपूत 2, मुस्लीम 8, ख्रिश्चन 1 आणि इतर समुदायातून 7 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे.
पक्षांतर केलेल्यांनाही उमेदवारी
काही दिवसांपूर्वी भाजप आणि निजदला सोडचिठ्ठी दिलेल्यांना देखील काँग्रेसने तिकीट देण्याची घोषणा केली आहे. अलीकडेच काँग्रेस पक्षात आलेले सोरब मतदारसंघातील नेते मधू बंगारप्पा, भाजपमधून बाहेर पडलेले माजी आमदार किरण कुमार, विधानपरिषद सदस्यत्वासह भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा त्याग केलेले पुट्टण्णा, काँग्रेसला पाठिंबा दिलेले होसकोटेचे अपक्ष आमदार शरत बच्चेगौडा, निजदला रामराम ठोकून काँग्रेस प्रवेश केलेल्या माजी विधानपरिषद सदस्य बेमेल एम. कांतराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कौटुंबिक राजकारणाची यावेळीही परंपरा
माजी केंद्रीयमंत्री के. एच. मुनियप्पा यांना देवनहळ्ळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुनियप्पा यांची मुलगी आमदार रुपकला या पुन्हा एकदा केजीएफमधून निवडणूक लढवतील. त्याचप्रमाणे काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामलिंगारे•ाr यांना बीटीएम लेआऊटमधून तर त्यांची कन्या आमदार सौम्या रे•ाr यांनाही तिकीट देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रभावी लिंगायत नेते आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांना दावणगेरे दक्षिणमधून तर त्यांचे पुत्र एस. एस. मल्लिकार्जुन यांना दावणगेरे उत्तर मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान आमदार कृष्णप्पा यांना विजयनगरमधून तर त्यांचे पुत्र प्रियकृष्णा यांना गोविंदराजनगरमध्ये तिकीट जाहीर करण्यात आले आहे.
सिद्धरामय्या कोलारसाठीही इच्छुक
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याविषयी निर्माण झालेल्या कुतूहलावरही पडदा पडला आहे. सिद्धरामय्या यांना म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व यतींद्र सिद्धरामय्या हे करत असून त्यांनी वडिलांसाठी मतदारसंघाचा त्याग केला आहे. शनिवारी याविषयी प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या यांनी आपण वरुणा आणि कोलार या मतदारसंघांमधून निवडणूक लढविण्याची इच्छा हायकमांडकडे व्यक्त केली होती. आपण दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे, असे त्यांनी सांगितले.
तीन-चार दिवसांत दुसरी यादी
काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून पुढील तीन-चार दिवसांत उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली जाईल. 95 टक्के विद्यमान आमदारांना तिकीट जाहीर केले आहे. उर्वरित ठिकाणी स्थानिक नेत्यांशी चर्चा करून दुसऱ्या यादीत नावे समाविष्ट केली जातील.
– डी. के. शिवकुमार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
काँग्रेसचे उमेदवार…
मतदारसंघ उमेदवाराचे नाव
चिकोडी-सदलगा गणेश हुक्केरी
कागवाड भरमगौडा उर्फ राजू कागे
कुडची महेंद्र तम्मन्नावर
हुक्केरी ए. बी. पाटील
यमकनमर्डी सतीश जारकीहोळी
बेळगाव ग्रामीण लक्ष्मी हेब्बाळकर
खानापूर डॉ. अंजली निंबाळकर
बैलहोंगल महांतेश कौजलगी
हुबळी-धारवाड पूर्व प्रसाद अब्बय्या
हल्याळ आर. व्ही. देशपांडे
कारवार सतीश सैल
भटकळ महांकाळ वैद्य
हानगल श्रीनिवास माने
रामदुर्ग अशोक पट्टण
जमखंडी आनंद सिद्धू न्यामगौड
मुद्देबिहाळ सी. एस. नाडगौडा
बसवन बागेवाडी शिवानंद पाटील
बबलेश्वर एम. बी. पाटील
इंडी यशवंत रायगौडा पाटील
बिदर दक्षिण अशोक खेणी
बिदर रहिम खान
भालकी ईश्वर खंड्रे
कनकपूर डी. के. शिवकुमार
वरुणा सिद्धरामय्या
जेवर्गी डॉ. अजय सिंग
चित्तापूर प्रियांक खर्गे
गदग एच. के. पाटील
सोरब मधु बंगारप्पा
सर्वज्ञनगर के. जे. जॉर्ज
गांधीनगर दिनेश गुंडूराव
देवनहळ्ळी के. एच. मुनियप्पा









