एकूण 3050 रुपये दर देणार : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस पाठविण्याचे आवाहन, प्रती टन अर्धा किलो साखर देण्यात येणार
खानापूर : खानापूर येथील तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला शुगर्स कारखान्याच्या 2023-24 सालातील गळीत हंगामाची सुरुवात नोव्हेंबर 1 पासून करण्यात आली असून पहिल्या पंधरा दिवसात पाठविण्यात आलेल्या उसाचा पहिला हप्ता 2800 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला असून पुढील काळात दर पंधरा दिवसांनी शेतकऱ्यांना पहिला हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, तसेच लैला शुगर्सकडून एकूण 3050 रुपये दर जाहीर करण्यात आल्याची माहिती कारखाना स्थळावर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील, संचालक चांगाप्पा निलजकर, ऊस विभागाचे अधिकारी बाळाराम शेलार उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, शेतकऱ्यांना एकूण 3050 रु. प्रती टन देण्यात येणार असून यात शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा 404 रुपये अधिक देण्यात येत आहेत. पहिला हप्ता ऊस पाठविलेल्या पंधरा दिवसात जमा करण्यात येणार असून एप्रिलच्या दरम्यान 200 रुपये दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर गणपतीच्या सणासाठी रुपये 50 तिसरा हप्ता जमा करण्यात येणार आहे. यासह ऊस तोड आणि वाहतूक 750 रुपये देण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना प्रती टन अर्धा किलो साखर 25 रु. दराने देण्यात येणार आहे. यावर्षी 3 लाख टनाच्या उसाचे गाळपाचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनी तालुक्यातील कारखान्यालाच ऊस पाठवावा, यावर्षी दुष्काळ पडला असून शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
यासाठी शेतकऱ्यांना जर आर्थिक गरज भासल्यास त्यांनी संचालक मंडळाशी संपर्क साधावा. ज्या शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस पाठवायचा आहे. त्यांना उसासाठी अगाऊ रक्कम देण्यात येईल, आणि योग्यवेळी उसाची उचल करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी खानापूरच्या कारखान्यालाच ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच शेतकऱ्यांचा अपघाती विमाही कारखान्याकडून देण्यात आलेला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक दर देण्यात आला असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.
कारखाना स्थळावर स्वर्गीय नीळकंठराव सरदेसाई यांचा पुतळा उभारणार
कारखान्याच्या उभारणीसाठी माजी आमदार स्वर्गीय नीळकंठराव सरदेसाई यांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांची आठवण या कारखाना स्थळावर कायम राहावी यासाठी कारखाना स्थळावर एक सुंदर गार्डन उभारून त्यामध्ये त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय व्यवस्थापन मंडळाने घेतला आहे. पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुतळा पूर्ण झाल्यानंतर लवकरच या ठिकाणी तो बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.









