तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस पाठविण्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांचे आवाहन
प्रतिनिधी/ खानापूर
लैला साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला काही तांत्रिक कारणामुळे थोडा उशीर झाला असला तरी सध्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यात आला आहे. साखर कारखाना सुरळीत सुरू झाला असून, गाळप क्षमता वाढवण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसात पाठवण्यात आलेल्या उसाचा पहिला हप्ता रुपये तीन हजारप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
काही दिवसानंतर दुसरा हप्ता जमा करण्यात येईल, तसेच मागील वर्षीचा तिसरा हप्ता 50 रु. प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला असून, तालुक्यातील शेतकऱ्यांनी लैला साखर कारखान्याला ऊस पाठवावा, असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी साखर कारखाना कार्यस्थळावर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले.
गेल्या पाच वर्षापासून लैला साखर कारखाना महालक्ष्मी ग्रुपकडून चालवण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांचे हितच जपण्याचा प्रयत्न महालक्ष्मी ग्रुपकडून करण्यात आला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना उसाचे बिल व्यवस्थित पोहचविण्यात आले आहे. यावर्षीच्या गळीत हंगामास महिनाभर उशीर झालेला आहे. बॉयलरची दुरुस्ती करण्यात आली असून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन बॉयलर पूर्णपणे नव्याने करण्यात आला आहे. यासाठी 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
साडेचार हजार टन प्रतिदिनगाळप करण्याचे उद्दिष्ट
कारखान्याची दैनिक गाळप क्षमता वाढलेली असून साडेचार हजार टन प्रतिदिन गाळप करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. साखर कारखान्याच्या व्यवहारात संपूर्णपणे पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे वजन चोख असून वजनात कोणताही गैरव्यवहार होणार नाही. याची खबरदारी घेण्यात आली आहे.
तसेच शेतकऱ्यांचा कसलाही ऊस नाकारण्यात येत नाही. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबणा होऊ नये यासाठी प्रत्येक पंधरा दिवसाला रुपये तीन हजार रु. प्रमाणे पहिला हप्ता जमा करण्यात येणार आहे. तसेच वाहतूकदारांचीही बिले दहा दिवसाला देण्यात येत आहेत. वाहतूकदारांसाठीही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूकदारांनाही याचा लाभ मिळत आहे.
वाहतूकदार अन् शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार
लैला साखर कारखान्याकडून वाहतूकदार आणि शेतकरी यांच्या हिताचाच विचार करण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी लैला साखर कारखान्याचा भविष्याचा विचार करून लैला साखर कारखान्यालाच ऊस पाठवावा, असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले आहे.









