सिंधू जलकरारावर पाकिस्तानची भारताला विनंती
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
भारताने सिंधू जलकराराप्रमाणे पाकिस्तानला पाणी न दिल्यास भारतावर अणुहल्ला केला जाईल आणि भारताने सिंधू नदीवर बांधलेली धरणे क्षेपणास्त्र हल्ला करुन फोडली जातील, अशी धमकी दिल्यानंतर आता पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली आहे. भारताने सिंधू जलकरार पुनर्जिवीत करावा आणि पाकिस्तानला पाणी सोडावे, अशी विनंती त्या देशाने भारताला केली आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी भारताला ही धमकी ते पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना तीन दिवसांपूर्वी दिली होती. भारताने त्या धमकीचा खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला होता. पाकिस्तानच्या अणुधमक्यांना भारत घाबरणार नसून आमची कळ काढल्यास पाकिस्तानला पुन्हा धडा शिकविला जाईल, असे भारताने त्याच्या प्रत्युत्तरात सोमवारी स्पष्ट केले होते.
भारताची कठोर कारवाई
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवितरण करार स्थगित करण्याची घोषणा केली होती. तसेच सिंधू आणि काश्मीर खोऱ्यातून वाहणाऱ्या सर्व नद्यांवर धरणे बांधून पाकिस्तानकडे वाहून जाणारे पाणी अडविण्याची योजना घोषित केली आहे. या घोषणेनुसार भारताने सिंधू, चिनाब, झेलम, सतलज, राबी आणि बियास या नद्यांचे पाणी अडविण्याच्या आणि वळविण्याच्या कामांना प्रारंभ केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सिंधू नदीत भारतातून होणारा जलविसर्ग कमी झाला असून त्याचा परिणाम पाकिस्तानच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा संदर्भ
भारताने सिंधू जलवितरण करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय लवादाकडे धाव घेतली होती. 8 ऑगस्ट 2025 या दिवशी आंतरराष्ट्रीय लवादाने त्याचा निवाडा दिला होता. भारताने हा करार स्थगित ठेवू नये. या कराराचे क्रियान्वयन करण्यात पुन्हा प्रारंभ करावा, अशी सूचना या निवाड्यात आहे. पाकिस्तानने भारताला विनंती करताना या निवाड्याचा आधार घेतला आहे. तथापि, भारताने हा निवाडा मान्य करण्यासच नकार दिला आहे. तसेच पाकिस्ताने दहशतवादी संघटनांना पाठबळ देणे आणि भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणणे अशी कृत्ये थांबविल्याशिवाय हा करार पुन्हा कार्यान्वित करणार नाही, असे पाकिस्तानला स्पष्टणे बजावले आहे. पाकिस्तानचे भवितव्य या करारावर आहे.









