सोनी (वार्ताहर)
सोनी (ता. मिरज) येथील महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग दोन वेळा प्रथम येण्याचा बहुमान पटकावलेल्या प्रमोद चौगुले यांची सोनी ग्रामस्थांच्या वतीने हत्तीवरून मिरवणूक व साखर वाटप करण्यात आले. असे यश मिळवणारे प्रमोद हे भारतातील एकमेव व्यक्ती असतील. गावातील विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन हे यश मिळवल्यामुळे त्यांचे यश हे खुपच मोठे आहे असे मत उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
प्रमोद चौगुले हे सोनी गावचे सुपुत्र आहेत सर्वसामान्य कुटुंबातून शिक्षण घेत, सोनी येथेच त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. वडील टेम्पो चालक व आई शिवणकाम करतात.
सायंकाळी सहा वाजता प्रमोद चौगुले यांची हत्ती वरुन मिरवणूक सुरू झाली यावेळी फटाक्यांची आतषबाजी तसेच अनेक ठिकाणी नागरिक घराच्या गच्चीवर उभे राहून फुलांचा वर्षाव करत होते. रात्री झालेल्या सत्कार कार्यक्रमात बोलताना सांगली कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील म्हणाले, आजचा युवक एमपीएससी करण्यासाठी कठोर परिश्रम घेत असतो, बऱ्याच व्यक्तींना ही परीक्षा एकदा उत्तीर्ण होणे देखील आव्हानात्मक असते. प्रमोद चौगुले यांनी सलग दोन वेळा प्रथम येण्याचा विक्रम केला आहे. हे सोनीकरांना अभिमानास्पद आहे. त्यामुळे हा कौतुक उत्सव भरघोस यशाप्रमाणे भव्य दिव्य होणे गरजेचे होते. म्हणून गावकऱ्यांच्या वतीने हत्तीवरून मिरवणूक काढण्याची व साखर वाटप करण्याची संकल्पना सुचली व आज ती पूर्णत्वास आणली आहे. या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श निर्माण होईल. सत्काराला उत्तर देताना प्रमोद चौगुले म्हणाले की, पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिला आल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने अशीच भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी दुसऱ्या परीक्षेची तयारी सुरू होती. गावकऱ्यांनी केलेला भव्य दिव्य सत्कार हा आत्मविश्वास वाढवणारा ठरला आणि त्यामुळे दुसऱ्या प्रयत्नात देखील महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान मिळवता आला. इतर ठिकाणी होणारे सत्कार व आपल्या गावात होणारा सत्कार हा नक्कीच वेगळेपण जपणारा आहे.
यावेळी आदित्य चव्हाण, सयाजी पाटील, हरिभाऊ पाटील, प्रा. डॉ.नंदकुमार पाटील, जयसिंग चव्हाण, महादेव चौगुले, सुलोचना पाटील, शाहीर देवानंद माळी, तेजल माळी, चारुदत्त पाटील, प्रफुल्ल ढोबळे, पूजा चौगुले, डॉ. साहिल नदाफ, एस. एस. कोळी आदी मान्यवरांचा विविध क्षेत्रातील यशाबद्दल सत्कार करण्यात आला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील, सरपंच शारदा जयसिंग यादव उपसरपंच सुरेश मुळीक सोनी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन डॉ. उल्हास माळकर या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील, अरविंद पाटील, प्रकाश कुंभार, मनोहर ढोबळे जयसिंग यादव, डॉ. विनायक माने, संजय माने, छबुताई जाधव, विठ्ठल पाटील, संजय जाधव, सतीश जाधव शामजी ढोबळे दिनकर पाटील फाउंडेशनचे सर्व सदस्य यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज जाधव यांनी केले.