वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या पुरूष दुहेरीच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुन्हा अग्रस्थानावर झेप घेतली आहे.
गेल्या 2 आठवड्यांच्या कालावधीत झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सात्विक आणि चिराग यांची कामगिरी दर्जेदार झाल्याने त्यांनी मानांकनात पुन्हा अग्रस्थान काबिज केले आहे. सात्विक आणि चिराग या जोडीने आशियाई स्पर्धेत विजेतेपद मिळवून मानांकनात अग्रस्थान पहिल्यांदा मिळविले होते. अलिकडच्या कालावधीत या जोडीने मलेशिया खुल्या सुपर 1000 दर्जाच्या तसेच इंडिया खुल्या सुपर 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धांमध्ये उपविजेतेपद मिळविले होते. पुरूष एकेरीत भारताचा एच.एस. प्रणॉय 8 व्या, लक्ष्य सेन 19 व्या, के. श्रीकांत 25 व्या आणि प्रियांशू राजवत 30 व्या स्थानावर आहेत.









