आता चंद्रापासून सर्वात कमी अंतर 170 किमी आहे आणि सर्वाधिक अंतर 4,313 किमी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारताची तिसरी मानवरहित चंद्र मोहीम ‘चांद्रयान-3’ने टिपलेले चंद्राचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. ‘चांद्रयान-3’ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ही छायाचित्रे घेतली. इस्रोच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पहिले छायाचित्र जारी करण्यात आले आहे. 5 ऑगस्ट 2023 रोजी ‘चांद्रयान-3’ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना निदर्शनास आलेल्या चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो क्लिक केला आहे.
‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी 22 दिवसांपूर्वी प्रक्षेपित करण्यात आले होते. चंद्र मोहीम आतापर्यंत सुरळीत चालली असून विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट-लँड करण्याची पूर्ण आशा इस्रोच्या शास्त्रज्ञांना आहे. भारताची तिसरी मानवरहित चंद्रमोहीम ‘चांद्रयान-3’ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. आता चंद्रापासून सर्वात कमी अंतर 170 किमी आहे आणि सर्वाधिक अंतर 4,313 किमी अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. आता अवकाशयान चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत असून पुढील काही दिवस यानाचा वेग कमी करून सामान्य पातळीवर आणण्याचा प्रयत्न बेंगळूरमधील इस्रोच्या केंद्रातून केला जाणार आहे.









