वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पहिली हॉकी इंडिया मास्टर्स चषक हॉकी स्पर्धेची घोषणा शुक्रवारी करण्यात आली असून अनुभवी पुरुष व महिला हॉकीपटूंचा त्यात सहभाग असणार आहे. ही स्पर्धा चेन्नईत 18 ते 27 जून या कालावधीत होणार आहे. हॉकी इंडियाने शुक्रवारी याची अधिकृत घोषणा करताना स्पर्धेची तारीख व ठिकाणही जाहीर केले. या स्पर्धेने भारतीय हॉकीमध्ये नवा अध्याय सुरू होणार असून त्यात अनुभवी खेळाडूंना प्राधान्य मिळणार आहे. या लीगच्या नियमानुसार पुरुष गटात सहभागी होणारे खेळाडू 40 किंवा त्याहून अधिक वयाचा तर महिला गटात 35 किंवा त्याहून अधिक वयाचा असणे बंधनकारक आहे. दोन्ही विभागातील संघांची घोषणा लवकरच केली जाईल. त्यात सहभागी होण्यासाठी संबंधित राज्य हॉकी संघटनेमध्ये खेळाडूची नोंदणी असणे आवश्यक आहे, असे हॉकी इंडियाने सांगितले. साखळी व बाद पद्धतीने ही लीग खेळविली जाईल. संघांची संख्या निश्चित झाल्यानंतर साखळी फेरीची रचना जाहीर केली जाईल. या लीगची घोषणा झाल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी आनंद व्यक्त करीत हॉकी इंडियाचे आभार मानले आहेत.









