वृत्तसंस्था /दुबई
पहिली ‘ग्लोबल चेस लीग’ 22 पासून सुरू झाली असून ती 2 जुलैपर्यंत दुबईमध्ये होणार आहे. यामध्ये ‘क्लासिकल’, ‘रॅपिड’ आणि ‘ब्लिट्झ’ या तिन्ही बुद्धिबळ प्रकारांमधील जागतिक विजेत्यांसह (विद्यमान आणि माजी) जगातील आघाडीचे बुद्धिबळपटू खेळताना दिसणार आहेत. यामुळे संयुक्त अरब अमिरातची ही राजधानी दोन आठवडे बुद्धिबळाचे केंद्र बनून राहील. 2021 मध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ विजेतेपदासाठीच्या लढतीनंतर दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेली ही दुसरी सर्वांत महत्त्वाची बुद्धिबळ स्पर्धा आहे. त्यात ‘चेस आयकॉन्स’, ‘सुपरस्टार’ आणि ‘प्रॉडिजीस’ (2002 मध्ये आणि त्यानंतर जन्मलेले खेळाडू) म्हणून वर्गीकृत केलेले 36 अव्वल दर्जाचे खेळाडू त्यात झळकणार आहेत. बुद्धिबळ जगतातील हे सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेत सहा वेगवेगळ्या संघांचे सदस्य या नात्याने भाग घेतील. ‘क्लासिकल’ बुद्धिबळातील माजी जगज्जेता आणि जलद तसेच ‘ब्लिट्झ’ प्रकारामधील जगज्जेता मॅग्नस कार्लसन त्यांचे नेतृत्व करेल. ’चेस आयकॉन्स’ या गटात कार्लसनचा समावेश होतो. त्याशिवाय त्यात माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद, दोन वेळा विश्वविजेता ठरलेला इयान नेपोम्नियाची, माजी ब्लिट्झ विश्वविजेता लेव्हॉन अरोनियन आणि मॅक्सिम व्हॅचियर-लॅग्रेव्ह, 2021 चा बुद्धिबळ विश्वचषक विजेता जान-क्रिझिस्टोफ डुडा यांचाही समावेश करण्यात आला आहे. ‘सुपरस्टार्स’च्या गटात नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह (2021 चा जलद बुद्धिबळातील विश्वविजेता), अलेक्झांडर ग्रिश्चुक, डॅनिल दुबोव्ह तसेच विदित गुजराथी, अर्जुन एरिगेसी, गुकेश डी. यासारख्या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.









