अभिनेत्री रश्मिका मंदानाने 5 एप्रिल रोजी स्वत:चा 28 वा वाढदिवस साजरा केला आहे. अभिनेत्रीच्या जन्मदिनी चाहत्यांना विशेष भेट मिळाली आहे. रश्मिका सध्या स्वत:चा आगामी चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’चे चित्रिकरण करत आहे. निर्मात्यांनी आता रश्मिकाचा चित्रपटातील पहिला लुक जारी केला आहे. द गर्लफ्रेंडमधील रश्मिकाची पहिली झलक पाहून चाहते उत्साहित झाले आहेत.
चित्रपटाची निर्मिती कंपनी गीता आर्ट्सने सोशल मीडियावर अभिनेत्रीचे दोन लुक पोस्टर शेअर केले आहेत. चित्रपटात रश्मिका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची भूमिका साकारत असल्याचे पोस्टरवरून लक्षात येते. एका पोस्टरमध्ये ती लाजल्याचे तर दुसऱ्या पोस्टरमध्ये कुठल्या तरी विचारात हरवल्याचे दिसून येते.
जग महान प्रेमकहाण्यांनी भरलेले आहे, परंतु काही प्रेमकहाण्या अशा आहेत, ज्या पूर्वी कधीच ऐकल्या गेल्या नाहीत तसेच पाहिल्या गेल्या नाहीत. द गर्लफ्रेंड अशाच प्रेमकहाणीचा चित्रपट असल्याचे रश्मिकाने म्हटले आहे.
रश्मिका आगामी काळात रेनबो, डी 51, छावा, पुष्पा2 या चित्रपटात दिसून येणार आहे. पुष्पा 2 मधील रश्मिकाचा श्रीवल्लीचा लुक देखील जारी करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये अभिनेत्री साडी परिधान करून असल्याचे दिसून येते.









