तब्बल चार कोटींचा ऐवज जप्त : 5.7 किलो सोने, आयफोनचा समावेश,केंद्रीय महसूल गुप्तचर खात्याची कारवाई
पणजी : मोपा विमानतळावर पहिल्यांदाच सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. केंद्र सरकारच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) शनिवारी रात्री अत्यंत गोपनीयरित्या केलेल्या धडक कारवाईत सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करून तब्बल 5.7 किलो सोने त्याचबरोबर आयफोन्स मिळून 4 कोटी ऊपये किमंतीचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात तीन संशयितांना अटक केली आहे. डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये इरफान (उत्तर प्रदेश), कामरान अहमद गयासुद्दीन खान (मुंबई), मोहम्मद इरफान गुलाम नबी (गुजरात) यांचा समावेश आहे. सीमाशुल्क कायदा 1962 च्या संबंधित तरतुदींनुसार संशयितातंना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
तिन्ही संशयित 12 ऑक्टोबर रोजी मुंबईहून अबुधाबीला गेले होते. नंतर ते सोने घेऊन इंडिगो विमान क्रमांक 6 इ-1506 मधून अबुधाबीहून आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा येथे शनिवारी रात्री पोहोचले. विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे डीआरआय गोव्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाईक करुन मालासह तिघांना अटक केली. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची तपासणी केली असता डीआरआयच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे 5. 7 किलो सोन्याची पेस्ट सापडली. ही पेस्ट त्यांनी आपल्या कपड्यांमध्ये लपविली होती. संशयितांकडून पेस्ट स्वरुपातील 5.7 किलो सोने जप्त करण्यात आले. याशिवाय 28 आयफोन्स तसेच 15 प्रो मॅक्स फोन बॅगमध्ये ठेवलेल्या पॅकेटमध्ये होते.
हायफाय कपडे अन् गोल्ड पेस्ट…
अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी सोन्याची पेस्ट एका प्रवाशाच्या कमरबंदात लपवून ठेवली होती. अन्य दोघांच्या कपड्यांच्या आतील भागात गोल्ड पेस्ट लपवून खास पद्धतीने कपडे शिवून घेतले होते. कुणालाही तस्करीची कल्पनाही येणार नाही, अशा पद्धतीने एकंदर रचना करण्यात आली होती.









