घरोघरी लक्ष्मीची प्रतिमा उभी करून विधिवत पूजा
बेळगाव : श्रावणधारांच्या साक्षीने श्रावणातील पहिला शुक्रवार मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. घरोघरी लक्ष्मीची प्रतिमा उभी करून तिची विधिवत पूजा केली. फुले, पाच प्रकारच्या पत्री यांनी देवीला सजवण्यात आले. तर तिच्यापुढे विविध फळे मांडून रांगोळी घालून आरास करण्यात आली. श्रावण म्हणजे सणांचा महिना. शुक्रवारनंतर पाठोपाठ नागपंचमी, मंगळागौर, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी अशी सणांची मालिकाच सुरू होते. यानिमित्ताने बाजारपेठेतसुद्धा फुलांची आवक दुपटीने वाढते. आवक वाढण्याबरोबरच दरातही वाढ होते.
संपूर्ण श्रावण महिनाभर फूलबाजाराला बहर
शेवंती, गुलाब, अॅस्टर, कमळ, केवडा अशा विविध फुलांचा वापर पूजेसाठी केला जातो. त्यामुळे संपूर्ण श्रावण महिनाभर बाजारपेठेतील फूलबाजाराला बहर आलेला असतो. पहिल्या शुक्रवारी देवीची प्रतिष्ठापना केल्यानंतर पुरणवरणाचा नैवेद्य दाखविला. सायंकाळी देवीची गाणी म्हणून साखरफुटाणे व दूध देऊन सुवासिनींची ओटी भरण्यात आली. आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार श्रावण म्हणजे सणांचा महिना. वात कमी होऊन पित्त प्रवृत्ती वाढते. म्हणून श्रावणामध्ये भाजलेले पदार्थ खाणे उत्तम मानले जाते. त्यामुळे आजही बहुसंख्य घरांमध्ये उपवास करून भाजलेल्या पदार्थांचेच सेवन करतात.









