अंतराळात जाऊन ‘टीव्ही-डी1’ पृथ्वीवर परतणार , मोहिमेसाठी नौदल टीमकडूनही रंगीत तालीम सुरू
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेसाठी भारताची तयारी जोरात सुरू आहे. पुढील आठवड्यात 21 ऑक्टोबर रोजी पहिली चाचणी घेण्यात येणार आहे. इस्रो 21 ऑक्टोबर रोजी ‘गगनयान’ चाचणी वाहन अंतराळ उड्डाण (टीव्ही-डी1) लाँच करणार असल्याची माहिती अवकाश संशोधन मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी बुधवारी दिली. ‘गगनयान’ची ही चाचणी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. अंतराळवीर केवळ क्रू मॉड्यूलमध्ये बसूनच अंतराळात जातील. 21 ऑक्टोबर रोजी चाचणीमध्ये, मॉड्यूल बाह्य अवकाशात पाठवले जाईल आणि नंतर पृथ्वीवर परत आणले जाईल. बंगालच्या उपसागरात ते यशस्वीपणे उतरवले जाणार असून भारतीय नौदलाचीही त्याच्यावर नजर राहणार आहे. यशस्वी अवतरणासाठी नौदल कर्मचाऱ्यांकडून रंगीत तालीम केली जात आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या चाचणीद्वारे क्रू एस्केप सिस्टमच्या सक्षमतेची चाचणी करणार आहे. ‘गगनयान’ मोहिमेतील हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या चाचण्यांमधील यशस्वी परिणामांच्या आधारे भारत 2024 पर्यंत मानवरहित आणि मानवसहित अंतराळ मोहिमा पाठवण्याची योजना आखत आहे. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 च्या यशानंतर इस्रो आता गगनयान मोहीम अवकाशात पाठवण्याच्या तयारीत आहे. इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच या मोहिमेच्या मानवरहित उ•ाणाची चाचणी घेतली जाणार आहे. इस्रोने आता 21 ऑक्टोबरला या चाचणीसाठी विकसित केलेल्या गगनयानमधून ‘क्रू एस्केप सिस्टम’ची चाचणी घेण्याची योजना आखली आहे. गगनयान कार्यक्रमांतर्गत अशाप्रकारच्या चार चाचण्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
इस्रोने फ्लाइट टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (टीव्ही-डी1) साठी तयारी सुरू केली असून या चाचणीमधून ‘क्रू एस्केप सिस्टीम’ची कार्यक्षमता सिद्ध होणार आहे. ‘क्रू एस्केप सिस्टम’ (सीईएस) हा गगनयानचा महत्त्वाचा घटक आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘टीव्ही-डी1’ची चाचणी केली जाणार आहे. यानंतर, दुसरे चाचणी वाहन ‘टीव्ही-डी2’ आणि पहिले मानवरहित गगनयान (एलवीएम3-जी1) चाचणी केली जाईल. दुसऱ्या टप्प्यांतर्गत चाचणी वाहन मोहीम (‘टीव्ही-डी3’ आणि ‘टीव्ही-डी4’) आणि एलवीएम3-जी2 रोबोटिक पेलोडसह पाठवण्याची योजना आहे.
इस्रोची गगनयान मोहीमही खूप खास आहे. याद्वारे अंतराळात मानवाला पाठवण्याची योजना आहे. यापूर्वी चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 मोहिमा मानवरहित होत्या. आता इस्रोला अंतराळात मानव पाठवायचा आहे. या मोहिमेच्या यशानंतर भारत अंतराळ विज्ञान क्षेत्रात आणखी एक भक्कम कामगिरी नोंदवेल. आता नव्या मोहिमेची तयारी जोरात सुरू असून वेगवेगळ्या उपकरणांचे भाग जोडण्याचे काम सुरू आहे. क्रू एस्केप सिस्टम (सीईएस) हा गगनयान मोहिमेतील महत्त्वाचा घटक आहे.









