वारणानगर / प्रतिनिधी
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने पोलिस सेवेत घेतलेले, देशाचे दोन पंतप्रधान यांचा विश्वास संपादन केलेले व गडहिग्लज येथे पोलीस उपनिरीक्षक असताना स्वातंत्र्यांचा पहिला ध्वज फडकवणारे पन्हाळ्याचे सुपूत्र मनोहर दत्तात्रय उर्फ नानासाहेब बांदिवडेकर (वय- १०४ ) यांचे आज दिल्लीत काल मंगळवार दि. ९ मे रोजी त्यांची मुलगी सौ. कल्पना हिचे घरी वृध्दापकाळाने निधन झाले.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने पोलिस सेवेत भरतीत कोल्हापूरसाठी दोन जागा ठरवल्या होत्या. मात्र नानासाहेबांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झालेल्या तत्कालीन कोल्हापूर संस्थानचे प्रायमिनिस्टर इ.डब्ल्यू.पेरी यांनी ब्रिटिश सरकारकडून जादा जागा मंजूर करून घेतल्या. पोलिस सेवेत घेतलेल्या व कोल्हापूर संस्थानच्या प्रायमिनिस्टरांचा विश्वास सार्थ ठरवणारे पन्हाळ्याच्या ऐतिहासिक मातीत जन्मलेले मनोहर ऊर्फ नानासाहेब दत्तात्रय बांदिवडेकर यांनी आज अखेरचा निरोप घेतला.
वडील दत्तात्रय विठ्ठल बांदिवडेकर ऊर्फ काका बांदिवडेकर हे सोनारकाम करत. तर आई आनंदीबाई ऊर्फ माई या गृहिणी. १९२३ साली काका बंदिवडेकरांनी पन्हाळ्यातील २० मित्रांसोबत सायकलवरून विशाळगड, गगनबावडा पर्यटन केले. पुरोगामी विचारांच्या काका व भाई बंदिवडेकरांच्या पोटी २९ एप्रिल १९२० या दिवशी नानासाहेबांचा जन्म झाला.नानासाहेबांचे प्राथमिक शिक्षण पन्हाळा येथे,माध्यमिक शिक्षण सातारा येथे,तर कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमध्ये इंटरपर्यंत शिक्षण झाले.त्यानंतर साईक्स लॉ कॉलेज येथे प्रवेश घेतला.पोलिस भरतीसाठी अर्ज करून तत्कालीन कोल्हापूर संस्थानचे प्रायमिनिस्टर इ. डब्ल्यू, पेरी यांच्या नजरेत भरल्याने १९४० साली पोलिस सेवेत ते रुजू झाले.
स्वातंत्र्यपूर्व व त्यानंतरच्या काळात केलेल्या पोलिस सेवेत स्व. पंडित नेहरू व स्व. लालबहादूर शास्त्री या दोन माजी पंतप्रधानांच्या संरक्षणाचे जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. नानासाहेबांनी पोलिस सब इनिस्पेक्टर पदापासून सुरू केलेल्या पोलिस सेवेत उपविभागीय पोलिस अधिकारी पदापर्यंत मजल मारली. १९५४ साली माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांचा मुक्काम रत्नागिरी येथील थिबा पॅलेसवर होता, तेव्हा पूर्ण दिवस सुरक्षा यंत्रणेत त्यांनी काम केले. तर १९५६ साली लालबहाद्दूर शास्त्री सहकुटुंब नागपुरात आले असताना त्यांच्याही सुरक्षा यंत्रणेत नानासाहेबांनी काम केले.
पोलिस सेवेच्या उत्तरार्धात १९७३ साली नानासाहेब सीआयडी अँच पुणे येथे रुजू झाले.निवृत्तीच्याच दिवशी कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे (ता. कराड) येथे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून ते रुजू झाले.हे पद त्यांनी १० वर्षे भूषविले.३४ वर्षे नोकरी करून ४३ वर्षे निवृत्ती वेतन घेणारे नानासाहेब बांदिवडेकर हे एकमेव व्यक्ती असतील.नानासाहेबांना पाच मुली व एक मुलगा,अशी सहा अपत्ये असून सर्व मुले उच्चशिक्षित आहेत.नानासाहेबांना नोकरीच्या काळात अनेक प्रशस्तिपत्रे,सन्मानचिन्ह मिळाली असून,आजही तो त्यांनी जपून ठेवली आहेत.
शंभरी मागील रहस्य
कमी आहार,भरपूर व्यायाम,आई-वडिलांची सेवा,प्रामाणिक राहणे,परमेश्वराचे नामस्मरण,स्वतःची तब्येत सांभाळणे हेच दिर्घ आयुष्या मागील रहस्य असल्याचे नानासाहेब सांगत होते.
फक्त वडिलांसाठी ऑफर नाकारली
१९४० साली नानासाहेबांना मास्तर विनायक यांनी चित्रपटात हिरो म्हणून काम करण्यासाठी बोलावले होते. पण, वडिलांचा त्याला विरोध असल्याने त्यावेळी नानासाहेबांनी ती ऑफर नाकारली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









