ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे गटातील 16 आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय घेण्यापूर्वी शिवसेना कुणाची याचा निर्णय आगोदर घ्यावा लागेल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
सत्तासंघर्षाच्या निकालादरम्यान 16 आमदार पात्र की अपात्र यासंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. मागील काही दिवस विधानसभा अध्यक्ष ब्रिटनच्या दौऱ्यावर होते. सोमवारी ते मुंबईत परतले. आज त्यांनी विधान भवनात एक बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत 16 आमदारांच्या निर्णयावर भाष्य केलं. नार्वेकर म्हणाले, ज्यावेळी शिवसेनेत बंड झाले. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीचा संपुर्णपणे आभ्यास करुन नेमका कोणता गट खरा आहे, याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर 16 आमदारांच्या पात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यात येईल. या निर्णयांसाठी कोणतीही घाई केली जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि कायद्यातील तरतुदींनुसार निर्णय दिला जाईल.
सर्वोच्च न्यायालयानं सत्तासंघर्षाबाबत निर्णय देताना संविधानिक शिस्त कायम ठेवली आहे. कार्यकारी मंडळ, विधीमंडळ आणि न्यायमंडळ तिघांनाही संविधानानं आपापल्या क्षेत्रात राहून काम करण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार न्यायालयाने अबाधित ठेवले आहेत या निर्णयाचे मी स्वागत करतो.








