मुख्यमंत्री सर्वेक्षणावरून काँग्रेसचा शशी थरूरांवर निशाणा
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
काँग्रेस नेते शशी थरूर यांना स्वत:च्या पक्षाकडूनच लक्ष्य व्हावे लागत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. मुरलीधरन यांनी शशी थरूर यांनी प्रथम आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे ठरवावे असे म्हणत थेट लक्ष्य केले आहे. शशी थरूर यांनी गुरुवारी एक सर्वेक्षण शेअर केले होते. यात केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटच्या (यूडीएफ) नेत्यांदरम्यान थरूर हे मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात पसंतीचे उमेदवार असल्याचा दावा करण्यात आला होता. मागील काही दिवसांमध्ये थरूर यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली आहे. तर त्यांनी आणीबाणीच्या निर्णयावर टीका करणारा लेख लिहिल्याने काँग्रेस नेतृत्व संतप्त झाल्याची चर्चा आहे.
सर्वेक्षणात कुणीही आघाडीवर राहिला असला तरीही 2026 च्या विधानसभा निवडणुकीत युडीएफच विजयी होणार आहे आणि मुख्यमंत्री युडीएफचाच होईल. आमचा उद्देश निवडणूक जिंकणे असल्याने आम्हाला अशाप्रकारच्या अनावश्यक वादात कुठलीच रुची नाही. केरळ काँग्रेसमध्ये अनेक वरिष्ठ नेते असून त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी विचारात घेतले जाऊ शकते. पक्षाकडे नियमांचे एक स्वरुप असून त्यानुसार पुढील मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मुरलीधरन यांनी म्हटले आहे.
थरूर यांच्यासमोर दोन मार्ग
शशी थरूर यांना काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाटत असेल तर त्यांनी स्पष्ट राजकीय मार्ग निवडावा. थरूर यांच्यासमोर दोन मार्ग आहेत. जर मतभेद असतील तर पक्षाच्या अंतर्गत व्यासपीठावर ते व्यक्त करण्याची संधी आहे. परंतु वर्तमान व्यवस्थेत राहणे असमर्थ वाटत असेल तर त्यांनी सोपविण्यात आलेल्या पदांवरून हटावे आणि स्वत:च्या पसंतीचा राजकीय मार्ग अनुसरावा असे मुरलीधर यांनी म्हटले आहे.
शशी थरूर हे काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सदस्य अन् पक्षाकडून नियुक्त स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. थरूर यांनी स्वत:च्या संसदीय जबाबदाऱ्या आणि पक्षाचे काम दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करत वाटचाल करावी. ज्या मुद्द्यांवर त्यांचे वेगळे मत आहे, ते पक्षाच्या कक्षेत राहून व्यक्त करता येते. तसेच उपलब्ध दोन पर्यायांपेक्षा हटून अन्य मार्ग निवडल्याने थरूर यांची राजकीय ओळख प्रभावित होईल. तसेच ही कृती पक्ष अन् थरूर दोघांसाठी नुकसानदायक ठरणार असल्याचे वक्तव्य मुरलीधरन यांनी केले आहे. तिरुअनंतपुरमचे खासदार थरूर हे काँग्रेस नेत्यांना सोडून सर्वांची प्रशंसा करतात असे उत्तर मुरलीधरन यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिले आहे.









