वृत्तसंस्था/ कॅनबेरा
भारत आणि पंतप्रधान इलेव्हन संघातील येथे शनिवारपासून खेळविण्यात आलेल्या दोन दिवसांच्या सरावाच्या सामन्यातील खेळाचा पहिला दिवस पावसामुळे रद्द करावा लागला. या सामन्यात गुलाबी रंगाचा चेंडू वापरण्यात येणार होता. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना मात्र गुलाबी रंगाच्या चेंडूवर फलंदाजीचा सराव करण्याची संधी हुकली.
मनुका ओव्हल मैदानावर उभय संघातील हा सराव सामना रविवारी प्रत्येकी 50 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र येथील हवामान पावसाळी असून रविवारी पुन्हा पावसाचा अडथळा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय संघाने यापूर्वी म्हणजेच 2022 च्या मार्च महिन्यात बेंगळूर येथे शेवटची दिवस-रात्रीची कसोटी खेळली होती. भारताने आतापर्यंत गुलाबी रंगाच्या चेंडूचा वापर केलेल्या चार कसोटी सामन्यात खेळ केला आहे. 2019 साली कोलकाता येथे बांगलादेश विरुद्ध, 2021 साली अहमदाबादमध्ये इंग्लंड विरुद्ध तर 2022 साली लंकेविरुद्ध बेंगळूरमध्ये भारतीय संघाने दिवस रात्रीच्या सामन्यात विजय मिळविला आहे. तर 2020 च्या अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून भारताला हार पत्करावी लागली होती.









