डिजिटल वॉच ठेवावे लागले बाहेर : परीक्षा केंद्रांवर पालकांची गर्दी
प्रतिनिधी/ बेळगाव
बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेचा पहिला दिवस सुरळीतपणे पार पडला. बेळगाव शहरातील 17 केंद्रांवर परीक्षा पार पडली. सकाळच्या सत्रात जीवशास्त्र तर दुपारच्या सत्रात गणित विषयाचा पेपर घेण्यात आला. सीईटी असल्यामुळे शहरातील सर्वच परीक्षा केंद्रांवर पालकांची गर्दी झाली होती.
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल तर बारावीनंतर सीईटी देणे गरजेचे असते. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या रँकिंगनुसार मेडिकल, इंजिनिअरिंग व इतर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. त्यामुळे बारावी परीक्षेइतकीच विद्यार्थी सीईटीची तयारी करत असतात. शनिवार दि. 20 व रविवार दि. 21 असे दोन दिवस कर्नाटक राज्यात सीईटी होणार आहे.
शनिवारी सकाळी 10.30 वाजता जीवशास्त्र विषयाचा पेपर होता. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यांतून विद्यार्थी शहरात दाखल झाले होते. सकाळी 8.30 वाजल्यापासून विद्यार्थी व त्यांचे पालक परीक्षा केंद्रांवर हजर होते. परीक्षा केंद्रांबाहेर विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना आत प्रवेश दिला जात होता. पहिला पेपर संपल्यानंतर काहीकाळ विश्रांती होती. दुपारी 2.30 वाजता गणित विषयाचा पेपर झाला. यामुळे परगावचे पालक दिवसभर परीक्षा केंद्रांबाहेर विद्यार्थ्यांची वाट पहात होते.
डिजिटल वॉचवर कारवाई
सध्या सर्रास विद्यार्थी डिजिटल वॉच वापरत आहेत. या डिजिटल वॉचचा मोबाईलप्रमाणे वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे कॉपी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, डिजिटल वॉच यावर कारवाई करण्यात आली. जे विद्यार्थी डिजिटल वॉच घालून परीक्षा केंद्रात आले होते, त्यांना ते बाहेरच ठेवून आत प्रवेश देण्यात आला. परीक्षा केंद्रांबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









