कोल्हापूर / विद्याधर पिंपळे :
काळानुसार वाहनामधील तंत्रज्ञान बदलल्याने, पेट्रोल पंपांच्या संख्येबरोबर पंपाचींही रचना बदलली आहे. पेट्रोल, डिझेलबरोबर आता शहरामध्ये गॅस, सीएनजी, बायो सीएनजी, इलेक्ट्रिक वरील वाहने धावू लागली आहेत. त्यामुळे इंधन पंपामध्येसुध्दा बदल सुरू झाले आहेत. कोल्हापूरात आता कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) पाईपलाईनव्दारे पुरवठा सुरू झाला आहे. कोल्हापूरात पहिला पाईपलाईनव्दारे पुरवठा करणारा सीएनजी पंप नुकताच सुरू झाला आहे.
जिल्ह्यातील पेट्रोल पंपामध्ये आमुलाग्र बदल सुरू आहेत. जिल्ह्यात सीएनजी गॅस पाईपलाईनही विस्तारू लागली आहे. ऑईल कंपन्यांनी आपले इंधन पंप डिजिटल केले आहेत. आता घरगुती गॅसबरोबर वाहनातील पंपासाठीचा सीएनजी गॅसपुरवठा पाईपलाईनद्वारे सुरू झाला आहे.
कोल्हापूर शहरामध्ये कांही भागामध्ये घरोघरी पाईपव्दारे घरगुती गॅसपुरवठा (पाईप नॅचरल गॅस) सुरू झाला आहे. त्यामुळे दारात येणाऱ्या गॅस सिलिंडर गाड्या कमी होऊ लागल्या आहेत. लवकरच पंपावरील टँकरही कमी होण्याची शक्यता आहे. गॅस पाईप लाईनद्वारे आता 24 तास गॅस पुरवठा सुरू झाला आहे. कागल–हातकणंगले पंचताराकींत औद्योगिक वसाहतीमध्ये सीएनजी हब स्टेशन आहे. येथूनच पाईपलाईनद्वारे शहरातील कावळा नाका येथील लक्ष्मी अॅटो सर्व्हीस येथील सीएनजी पंपावर थेट गॅसपुरवठा सुरू झाला आहे. इतर सीएनजी पंपांवर टँकरद्वारे गॅस पुरवठा केला जात आहे. हा सीएनजी गॅस कोल्हापूरसाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीमार्फत सर्व पंपासाठी वितरण करत आहे.
कोल्हापूरसाठी मिरज किंवा हजारवाडी येथून पेट्रोल, डिझेल टँकरद्वारे येत आहे. पेट्रोल –डिझेलच्या वाढत्या दरावर पर्याय म्हणून आता कमी इंधनाचे गॅस, सीएनजी व इलेक्ट्रिक वाहने बाजारात आली आहेत. एयामुळे वाहनधारकांचा कल आता अशा वाहनांकडे वाढला आहे. यासाठी आता शहरात गॅस व सीएनजी पंपही सुरू झाले आहेत. शहरामध्ये 4 सीएनजी पंप सुरू आहेत. देवकर पानंद, उद्यमनगर, राजारामपुरी व कावळा नाका येथे ते कार्यरत झाले आहेत.
उद्यमनगर येथील उमिया पंप हा बायो सीएनजीचा आहे. तर कावळा नाका येथील लक्ष्मी अॅटो सर्व्हिस पंप आता पाईपलाईनव्दारे गॅसपुरवठा करणारा शहरातील पहिला पंप ठरला आहे. गेल्या महिन्यापासून हा पंप सुरू झाला आहे. गॅस 24 तास थेंट पंपावर येत आहे. तर इतर सीएनजी पंपावर हा गॅस टॅकरव्दारे पोहोचवला जात आहे. 1 किलो गॅस म्हणजे 1.689 लिटर तर 1 लिटर गॅस म्हणजे 0.592 किलो असे गणित आहे.
शहरात सीएनजी वाहनाबरोबर सीएनजी पंपाची संख्या वाढवण्याची गरज आहे. यामध्ये राजकीय वातावरणाबरोबर कंपन्यांकडून मिळणाऱ्या कॉम्प्रेससारख्या यंत्रणेचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. टँकरद्वारे होणाऱ्या गॅसचा पुरवठा होत असलेल्या, पंपावर गॅसचे प्रेशर कमी असल्याने वाहनधारकानां कांही काळ गॅस भरण्यासाठी थांबावे लागते. पण पाईपव्दारे गॅस पुरवठ्यामध्ये कोणताच अडथळा येत नाही. 24 तास गॅसचा पुरवठा प्रेशरने होत असतो. गॅस पाईपलाईनमुळे भविष्यात इंधनाचा पुरवठा टॅकरमुक्त होणार असल्याचे चित्र पहायला मिळण्याची शक्यता आहे.
- कोल्हापूरातील पहिला पाईपव्दारे पुरवठा करणारा सीएनजी पंप
दोन महिन्यांपूर्वी आपला पंप कार्यान्वित झाला आहे. थेट पाईपद्वारे हा गॅस 24 तास उपलब्ध होत आहे. शहरात मोजकेच सीएनजी पंप असून, यामध्ये आणखी वाढ होण्याची गरज आहे. यासाठी कंपनीने गॅस पुरवठा करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
–नंदकुमार इंगवले, लक्ष्मी ऑटो सर्व्हीस, कावळा नाका
- बायो–सीएनजीचा पुरवठा टॅकरद्वारे
शहरात चार सीएनजी पंप असून, बायो–सीएनजीचा आपला एकमेव पंप आहे. या पंपासाठी वारणानगर येथून टँकरव्दारे या गॅसचा पुरवठा होत आहे. या गॅस पुरवठ्याचे प्रेशर कमी झाल्यास, वाहनामध्ये गॅस सोडण्यासाठी थांबावे लागते. बायो–सीएनजाचा पुरवठी सुध्दा पाईपलाईनद्वारे व्हावा.
–कुशाल पटेल, उपाध्यक्ष, कोल्हापूर पेट्रोल –डिझेल असोसिएशन








