हॉस्पिटलचे डॉ. बसवराज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त बीएचएस लेकव्ह्यू सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे ‘फर्स्ट चॉईस फॉर इमर्जन्सी’ ही सुविधा जनसेवेत रुजू करण्यात येत आहे. अलीकडे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय वेगवेगळ्या गंभीर आजारांनी रुग्ण त्रस्त आहेत. ज्या रुग्णाला त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज आहे, अशा रुग्णाला सर्वप्रथम या इमर्जन्सी विभागामध्ये दाखल केले जाईल. यासाठी कोणतीही कागदपत्रे किंवा प्रथम पैसे भरावेत अशी सक्ती केली जाणार नाही, अशी माहिती लेकव्ह्यू हॉस्पिटलचे डॉ. बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, लेकव्ह्यू हॉस्पिटल ‘गोल्डन अवर’ म्हणजेच कोणतीही दुर्घटना घडल्यानंतरच्या पहिल्या सहा तासांना अतिशय महत्त्व देत असते. ज्या रुग्णाला तातडीने ऑर्थोपेडिक, न्युरो, स्पाईन, प्लास्टिक सर्जरी, व्हॅस्क्युलर, गायनिक अशा कोणत्याही स्वरुपाची तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज आहे, त्या रुग्णाला प्रथम इमर्जन्सी विभागात दाखल करून उपचार सुरू केले जातील. रुग्णावर प्राथमिक उपचार करून त्याच्या कुटुंबीयांना तो त्रस्त असणाऱ्या आजाराबद्दल माहिती देण्यात येईल. कुटुंबीयांनी जर अन्यत्र रुग्णाला हलविण्याची इच्छा दर्शविली तर लेकव्ह्यू रुग्णवाहिकेमधूनच त्याला दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यात येईल. या दरम्यान झालेल्या प्राथमिक उपचारांचा खर्च त्याला सांगितला जाईल व तो परवडणाराच नसेल तर पैसे भरण्याची सक्ती केली जाणार नाही. मात्र, याला काही अपवाद असू शकतील, असेही ते म्हणाले. लेकव्ह्यू हॉस्पिटलची शहर मर्यादित स्वरुपात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. लेकव्ह्यूमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांनी 7022044014 या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल, असे डॉ. विश्वनाथ उप्पलदिनी यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी रुग्णाला सर्वप्रथम साहाय्यक डॉक्टर तपासतील आणि आवश्यकतेनुसार सिनियर डॉक्टर्सना निरोप देतील, असे डॉ. मल्लिकार्जुन यांनी सांगितले.









