राजस्थानात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. बहुतांश राजकीय पक्षांनी स्वत:चे सर्व उमेदवार घोषित केले आहेत. राजस्थानला या निवडणुकीनंतर कदाचित नवा मुख्यमंत्रीही मिळू शकतो. परंतु राजस्थानचा पहिला मुख्यमंत्री झालेले हिरालाल शास्त्राr यांच्याबद्दल जाणून घेणे यानिमित्ताने रंजक ठरणार आहे. शास्त्राr यांनीच देशातील सर्वात मोठे मुलींसाठीचे विद्यापीठ स्थापन केले होते.
संस्कृतचे विद्वान
हिरालाल शास्त्री यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1899 रोजी जयपूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. 1920 मध्ये त्यांनी साहित्यात पदवी प्राप्त केली होती. 1921 मध्ये जयपूरच्या महाराज कॉलेजमधून त्यांनी बीए केले होते. त्यानंतर त्यांनी राज्यसेवेत नोकरीसाठी अर्ज केला आणि गृह आणि विदेश विभागात सचिवपदापर्यंत पोहोचले होते. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी संस्कृतमध्ये शास्त्री ही उपाधी मिळविली होती. यानंतर हिरालाल जोशी हे हिरालाल शास्त्राr ठरले होते. यानंतर विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या कार्यात भाग घेतला होता.
नेहरू अन् पटेल यांचे निकटवर्तीय
हिरालाल शास्त्री यांची स्वत:च्या गावात एक आश्रम सुरू करण्याची इच्छा होती. परंतु त्यावेळी राजघराण्यांचा मोठा हस्तक्षेप असायचा, यामुळे राजघराण्याच्या आदेशानुसार ते अध्यापक म्हणून काम करू लागले. यानंतर काही दिवसातच शास्त्री शाळा आणि
कॉलेजसोबत राजकारणातही सक्रीय झाले. जाहीर सभांमध्ये भाग घेऊ लागले. कालौघात स्वत:च्या कार्यामुळे शास्त्री हे नेहरू आणि पटेल यांचे निकटवर्तीय ठरले. राजस्थानची स्थापना झाली नसताना जयपूर प्रजामंडळ नावाने एक समूह चालायचा, ज्याचा राजकारणावर विशेष प्रभाव होता. त्यावेळी जमनालाल बजाज हे जयपूर प्रजामंडळची जबाबदारी सांभाळायचे. 1942 मध्ये जमनालाल यांचे निधन झाल्यावर शास्त्री हे जयपूर प्रजामंडळ चालवायला लागले आणि याचदरम्यान ते नेहरू आणि पटेल यांच्या सान्निध्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर संविधान सभा स्थापन झाली, या सभेत हिरालाल यांनी स्वत:ची भूमिका प्रखरपणे मांडली, त्यांचा व्यासंग पाहून सरदार वल्लभभाई पटेल हे त्यांचे प्रशंसकच झाले होते.

असे झाले राज्याचे पहिले मुख्यमंत्री
25 मार्च 1948 रोजी अनेक संस्थांनांना मिळून राजस्थान हे मोठे राज्य निर्माण झाले. 30 मार्च 1949 रोजी संपूर्ण राजस्थानची स्थापना झाली. मेवाड, मारवाड समवेत अनेक प्रजामंडळांमध्ये चालत असलेली लोकप्रिय सरकारे संपुष्टात आली. अशा स्थितीत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावांची चर्चा होऊ लागली. त्यावेळी जयनारायण व्यास आणि माणिक्यलाल वर्मा हे प्रभावशाली नेते मानले जायचे. परंतु पटेल यांचा हिरालाल यांच्यावर पूर्ण भरवसा होता. पटेल यांनीच हिरालाल शास्त्री यांना राजस्थानचे पहिले मुख्यमंत्री निवडण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री होताच शास्त्री हे अनेक दिग्गज नेत्यांना खटकू लागले होते. राजस्थानच्या स्थापनेनंतर जयपूरमध्ये एक उद्घाटन सोहळा झाला, यात व्यासपीठावर सर्वप्रथम राजघराण्याचे सदस्य आणि शास्त्री दुसऱ्या रांगेत अधिकारी आणि अखेरच्या रांगेत काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु जयनारायण व्यास आणि माणिक्यलाल वर्मा यासारख्या नेत्यांनी याला स्वत:चा अपमान मानून कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता,
पटेल यांच्या निधनानंतर शास्त्राr पडले एकाकी
1950 मध्ये सरदार पटेल यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू यांचा दबदबा वाढला होता. नेहरूंचे प्रत्येक राज्यात निकटवर्तीय होते आणि पटेल यांच्या निधनानंतर शास्त्री हे राजस्थानात एकाकी पडले होते. शास्त्री यांची बाजू घेणारा दिल्लीत कुणीच नव्हता. याचमुळे 3 जानेवारी 1951 रोजी शास्त्री नी अचानक मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
मुलीच्या स्मृतिप्रित्यर्थ गर्ल्स युनिव्हर्सिटी
जयपूरनजीकच्या टोंक जिल्ह्यात वनथली गाव आहे. शास्त्री हे स्वत:ची पत्नी रतन आणि मुलगी शांतासोबत तेथे जीवन कुटीर आश्रम स्थापन करून राहू लागले होते. तेथे ते लोकांची सेवा करायचे. परंतु त्यांची मुलगी वयाच्या केवळ 12 व्या वर्षी निर्वतली होती. हिरालाल शास्त्री आणि त्यांच्या पत्नीने स्वत:च्या मुलीच्या स्मृतिप्रित्यर्थ वनस्थली विद्यापीठाची स्थापना केली होती. पूर्वी याचे नाव शांताबाई शिक्षा कुटीर होते. आज हे देशातील सर्वात मोठे मुलींसाठीचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठात 2 हजारांहून अधिक युवती शिक्षण घेत आहेत.









