वृत्तसंस्था / विजयवाडा
बर्ड फ्ल्यूचा भारतातील प्रथम रुग्ण आंध्र प्रदेशात सापडला आहे. याला एव्हियन फ्ल्यू किंवा एच 5 एन 1 या सांकेतिक नावानेही ओळखले जाते. हा रुग्ण सापडल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सावधपणे पावले टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेजारच्या तेलंगणा राज्यानेही या संदर्भात दक्षता बाळगण्याचे आदेश दिले आहेत.
तेलंगणा सरकारने आंध्र प्रदेशातून कोंबड्या घेऊन येणाऱ्या ट्रक्स किंवा वाहनांना आपल्या राज्यात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोंबड्यांच्या सहवासात अधिक काळ राहणाऱ्या लोकांना हा रोग होण्याची शक्यता अधिक असते. या रोगामुळे कोंबड्याही नष्ट झाल्याने कोंबडी पालन करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होऊ शकते. या रोगाचा संसर्ग झालेल्या कोंबड्यांची कत्तल करावी लागते. या रोगामुळे मृत झालेल्या पक्ष्यांना किंवा कोंबड्यांना त्वरित नष्ट करावे लागते. अन्यथा माणसांना या रोगाची लागण होऊ शकते, अशी माहिती दिली गेली आहे. आंध्र प्रदेश सरकारने आपल्या सार्वजनिक स्वच्छता विभागाला यासंबंधात पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या वाहनांची कठोर तपासणी तेलंगणात केली जात आहे. दोन्ही राज्यांचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात असून रोग पसरु नये याची दक्षता घेण्यात येत आहे.









