वृत्तसंस्था / नवी दिल्ली
19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवशीय मालिकेसाठी बुधवारी रवाना झालेल्या भारतीय क्रिकेटपटूंच्या पहिल्या तुकडीत वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांचा समावेश होता.
कोहली आणि रोहीतसोबत कसोटी आणि एकदिवशीय कर्णधार शुभमन गिल, सलामीवीर यशस्वी जैस्वाल, अष्टपैलू नितीश कुमार रे•ाr आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध प़ृष्णा यांच्यासह काही सपोर्ट स्टाफचे सदस्य होते. सकाळी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्यासोबत काही चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी रांगेत उभे होते. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कोचिंग स्टाफचे काही इतर सदस्य संध्याकाळी रवाना झाले. येत्या रविवारी पर्थमध्ये पहिला वनडे सामना होईल, त्यानंतर अॅडलेड आणि सिडनी येथे उर्वरित दोन सामने होतील.
त्यानंतर पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका होईल आणि त्यात सहभागी होणारे उर्वरित खेळाडू 22 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. ही मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरू होईल. रोहीत आणि कोहली यांच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू असल्याने वनडे मालिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. दोघेही आता कसोटी आणि टी-20 मधून निवृत्त झाले आहेत. मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवल्यानंतर गंभीर यांनी म्हटले होते की, या मालिकेत दोघांचा चांगला खेळ होईल, अशी आशा आहे. परंतु 2027 च्या विश्वचषकाच्या संधींबद्दल बोलण्याचे त्यांनी टाळले.
50 षटकांचा विश्वचषक अजून अडीच वर्षे दूर आहे. वर्तमानात टिकून राहणे खूप महत्वाचे आहे. अर्थातच ते दर्जेदार खेळाडू आहेत. ते परत येत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचा अनुभव मौल्यवान ठरणार आहे, असे गंभीर यांनी मालिकेनंतरच्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. आशा आहे की ते दोघेही यशस्वी दौरा करु शकतील आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे एक संघ म्हणून आपण यशस्वी मालिका खेळू शकू, असे गंभीर यांनी दोन्ही माजी कर्णधारांच्या भविष्याबद्दल विचारले असता म्हटले होते.









